वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक संतप्त
सावंतवाडी : घोडेमुख येथील रस्त्यावर एका गव्याने दुचाकीला धडक दिल्याने प्राथमिक शिक्षिका जखमी झाल्या. सृष्टी रविराज पेडणेकर (वय ४८) असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. त्या सावंतवाडीहून आजगाव प्राथमिक शाळेत जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि आरोस हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी जखमी शिक्षिकेला तातडीने मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. अदिती ठाकर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारांसाठी त्यांना सावंतवाडीला पाठवले. यावेळी, दत्तगुरू कांबळी आणि सौ. रूपाली कोरगावकर या शिक्षकांनी त्यांना मदत केली. या भागात गव्यांचा वावर वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे ग्रामस्थ, वाहनधारक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. जवळच वन विभागाची चौकी असूनही या समस्येवर ठोस उपाययोजना होत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. या अपघातांबाबत वन विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.