कणकवली : अल्पवयीन शाळकरी मुलीस फूस लावून पळविणाऱ्या युवकास कणकवली पोलिसांनी अवघ्या ४८ तासांमध्ये शोधून काढले आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबीने तपास करून मुलीसह पसार असलेला संशयित मल्लिकार्जुन चनाप्पा सत्याळ (२०, रा. विजापूर, राज्य कर्नाटक) याच्या मलकापूर (जिल्हा सांगली) येथे शनिवारी सकाळी ७ वा. सुमारास मुसक्या आवळल्या. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ही कामगिरी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांच्या उपस्थितीत हवालदार सुदेश तांबे, पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली जाधव यांनी केली. ही घटना गुरुवार, ७ ऑगस्टला सकाळच्या सुमारास घडली होती.
अल्पवयीन मुलगी ‘शाळेत जाते’ असे सांगून घराबाहेर पडली. मात्र ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी कणकवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. आपल्या मुलीला मल्लिकार्जुन याने फुस लावून पळून नेल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली.
मात्र, मल्लिकार्जून याचा मोबाईल बंद असल्याने तो नेमका कुठे गेला असावा, असा प्रश्न होता. मल्लिकार्जुन याचे गाव कर्नाटक राज्यातील अथनी येथे असल्याने पोलिसांनी सर्वप्रथम अथनी गाठले. मात्र, मलिकार्जुन तेथे नव्हता. मल्लिकार्जुन याचे वडील रत्नागिरी येथे एका चिरे खाणीवर काम करत असल्याने तो तेथे गेला असेल, असा पोलिसांनी अंदाज काढला. तर कणकवली पोलीस रत्नागिरीच्या दिशेनेही निघाले होते.
याचवेळी विविध तांत्रिक बाबीच्या अंगाने केलेल्या तपासानुसार मल्लिकार्जुन हा मलकापूर येथे असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कणकवली पोलिसांचे पथक मलकापूरच्या दिशेने रवाना झाले. कणकवली पोलीस हे तांत्रिक बाबीने केलेल्या तपासातून मिळालेल्या ‘लोकेशन’वर पोहोचले. तेथे कर्नाटक पासिंगची एक क्क्रुझर उभी दिसली. पोलिसांनी क्रुझर चालकाकडे चौकशी केली असता परिसरातच संशयित मल्लिकार्जुन व सदर अल्पवयीन मुलगीही आढळून आली. कणकवली पोलिसांनी दोघांनाही कणकवली पोलीस ठाण्यात आणले असून मल्लिकार्जुन चौकशी करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले जाणार असून अधिकच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार संशयित मल्लिकार्जुन हा दुचाकीने सदर अल्पवयीन मुलीला कणकवली होऊन अथनी (राज्य कर्नाटक) येथे घेऊन गेला. तेथे तो मुलीसह एक रात्र आपल्या मित्राकडे राहिला. त्यानंतर भाड्याची क्रुझर घेऊन तो मुलीसह मलकापूर येथे गेला असे, तपासात निष्पन्न झाल्याचेही श्री. जाधव यांनी सांगितले.