20.6 C
New York
Sunday, August 10, 2025

Buy now

कणकवली कलमठ येथील घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कणकवली : कलमठ – बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडून दोन बंगल्यांमधील मिळून जवळपास २ लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी आणखीन दोन चोरट्यांना कणकवली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कर्नाटक राज्यातून अटक केली. अजिझ दादा पिरमानगुळी (२८) व विवेक शिवाप्पा कुंभार (२५, दोन्ही रा. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी चोरट्यांची नावे आहेत. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान या घटनेप्रकरणी लखन अशोक माने (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) या संशयिताला यापूर्वीच अटक करण्यात आली असून सध्या त्याचा ताबा कर्नाटक पोलिसांकडे आहे.

सदरची घरफोडी ३ जूनच्या पहाटे घडली होती. चोरट्यांनी एकूण चार बंद बंगले फोडले. त्यातील संजय सावंत व माधव ढेकणे यांच्या घरांतून मिळून जवळपास २ लाखांचे सोन्याचे दागिने व अन्य मुद्देमाल चोरीस गेला होता. घटनेनंतर दोन आठवड्यांनी संशयित लखन माने याला पोलिसांनी कर्नाटक येथून अटक केली होती. लखन याच्याकडील चौकशीत त्याच्या अन्य दोन साथीदार चोरट्यांची नावे निष्पन्न झाली होती. मात्र, हे दोन्ही चोरटे सापडून येत नव्हते.

दरम्यान कर्नाटक येथेही घरफोडीची घटना घडली असून तेथे दोन चोरटे अटक झाल्याची माहिती कणकवली पोलिसांना प्राप्त झाली. तपासाअंती हे दोन्ही चोरटे कलमठ येथील घरफोडीत सहभागी होते, असे निष्पन्न झाले. त्यानुसार कणकवली पोलिसांचे पथक गुरुवारी कर्नाटकला रवाना झाले. पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, हवालदार दीपक चव्हाण, कॉन्स्टेबल सुशांत कोलते यांचा समावेश होता. पथकाने कर्नाटक येथे कोठडीत असलेल्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा कणकवली पोलीस ठाण्यात आणले.

शुक्रवारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी चोरट्यांनी चोरलेला मुद्देमाल नेमका कुठे विकला? त्यांचे आणखीन साथीदार आहेत का? सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अन्य घरफोड्या, चोऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे का, याबाबतची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती तपासी अंमलदार तथा पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे यांनी दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!