कणकवली : शहरातील महाजन चाळीत राहणाऱ्या श्रीमती सुनंदा श्यामसुंदर कसवणकर ( वय ७५ मूळ रा. कसवण – सध्या रा. कणकवली ) या बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत सुंदर सुरेश महाजन ( वय ४२, रा. कणकवली ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात माहिती दिली.
शहरातील महाजन चाळीत सुनंदा या एकट्या राहत होत्या. चाळीचे मालक सुंदर महाजन यांच्या घरी दररोज टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यासाठी त्या नेहेमी जात असत. मंगळवारी सायंकाळी सुनंदा या महाजन यांच्याकडे टीव्ही पहाण्यासाठी गेल्या होत्या. टीव्हीवरील कार्यक्रम पाहिल्यानंतर त्या घरातून बाहेर पडल्या. दुसऱ्या दिवशी सुंदर महाजन यांना त्यांच्या घराचा दरवाजा बंद दिसला. त्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्या बेपत्ता झाल्याची खबर महाजन यांनी दिली आहे. उंची पाच फूट, अंगावर फुले असलेली साडी, हातात मोरपीस रंगाच्या बांगडया आहेत, अशा वर्णनाची व्यक्ती कुणास आढळून आल्यास कणकवली पोलीस ठाण्याची संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.