देखावे ठरले सप्ताहाचे आकर्षण
सप्ताहानिमित्त शहरात भक्तिमय वातावरण
कणकवली : शहरातील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिराच्या हरीनाम सप्ताहाची गुरुवारी नगरप्रदक्षिणेने सांगता झाली. सहाव्या दिवशी आंबेआळी मित्रमंडळाने काढलेला विराटरुपी कृष्णदर्शन तर बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळाने काढलेला अफजलखानाचा वध हे देखावे लक्षवेधी ठरले. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवारी ३१ जुलै रोजी प्रारंभ झाला होता. यानिमित्ताने मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सप्ताहानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये रात्री उशिरापर्यंत विविध मंडळांच्या भजनांनी रंगत आणली. गुरुवारी सकाळी नगरप्रदक्षिणा झाली. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता झाली.