सावंतवाडीतील नागरिकांच्या तक्रारी
पोलिसांकडून शहर सोडण्याची सूचना
सावंतवाडी : जिल्ह्यात सुरू असलेल्या चोरी, घरफोड्या आणि चैन स्नॅचिंगचा फटका बहुरूपी कलाकारांना सहन करावा लागला. या ठिकाणी आपली कला सादर करण्यासाठी आलेल्या नगर येथील दोघा कलाकारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना तुमची कला सादर करा परंतु एका दिवसाच्या वर या ठिकाणी थांबू नका, अशा सूचना दिल्या. त्यामुळे त्या कलाकारांना सावंतवाडी सोडून अन्य ठिकाणी जावे लागले. ही घटना आज सावंतवाडी शहरात घडली. नगर येथील दोघे बहुरूपी कलाकार या ठिकाणी आले होते. त्यांनी पोलिसांच्या वेषात आपण कला सादर करणार आहे, असे पोलिसांना कळवले. तशी येथील पोलीस ठाण्यात आपली नोंद करून शिरोडा नाका परिसरात ते कला सादर करण्यासाठी गेले. मात्र त्या ठिकाणी आपल्या स्टाईलने ते नागरिकांची फिरकी घेत असताना अनेक लोकांनी ते चोरटे असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांची संपर्क साधला व त्यांना ताब्यात द्या, अशी मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जावून खात्री केली असता ते बहुरूपी असल्याचे पुढे आले. मात्र लोकांची तक्रारी लक्षात घेता त्यांनी त्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नये, अशा सूचना पोलिसांनी त्या कलाकारांना दिल्या. त्यामुळे या सर्व घटनांचा फटका त्यांना सहन करावा लागल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.