23.5 C
New York
Wednesday, August 6, 2025

Buy now

नरहरी सोनाराचा चलचित्र देखावा ठरला लक्षवेधी

कलमठ बाजारपेठतील विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह उत्साहात

कणकवली : कलमठ बाजारपेठेतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या हरिनाम सप्ताहानिमित्त ‘नरहरी सोनाराची’ या कथेवर साकारलेल्या चलचित्र देखाव्याची वाजत-गाजत दिंडी काढण्यात आली. हा देखावा लक्षवेधी ठरला. दिंडी अबलावृद्धांसह महिलांनी हरिनामाचा जयघोष केल्यामुळे परिसर दुमदुमून गेला.
श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या हरिनाम सप्ताहास मंगळवारी सकाळी घटस्थापनेने प्रारंभ झाला. त्यानंतर विविध धार्मिक कार्मक्रम पार पडले. वाडीनिहाय अहोरात्र भजनांचे पार पडले. सप्ताहानिमित्त श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीकडे आकर्षक आरास करण्यात आल्याने विठ्ठल-रखुमाईचे हे रुप भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.याशिवाय मंदिरात परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.
दिवसभर भजनी मंडळींनी भजने सादर करून वातावरण भक्तिमय केले. रात्री बाजारपेठतील मंडळीनी कथा नरहरी नरहरी सोनाराची या कथेवर चलचित्र देखावा साकारला होता. या देखाव्याची कलमठ माणिक चौक ते श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात वाजत-गाजत दिंडी काढण्यात आली. नरहरी सोनार हा महादेवाचा निस्मिम भक्त असतो. तो केवळ महादेवाचे दर्शन घेतो. त्याची निस्मिम भक्ती पाहून एक सावकार सोनाराला विठ्ठलाला सोन्याचा कमरपट्टा बांधण्याचे सांगतो. नरहरी सोनार महादेवा व्यक्तिरिक्त अन्य कोणत्याही देव-देवींची दर्शन घेत नसल्याने तो आपल्या डोळ्यावर पट्टीबांधून मंदिरातील विठ्ठलच्या कमरेला सोन्याचा कमरपट्टा बांधण्यास जातो, तेव्हा त्याला महादेवाचा भास होतो. त्यानंतर सोनार आपल्या डोळ्यांवरील पट्टी उतरून पाहतो तर विठ्ठल देव त्याच्यासमोर प्रकट होतो. सोनाराची महादेवाप्रति निस्मिम भक्ती पाहून विठ्ठल त्याच्यावर प्रसन्न होते. महादेव आणि माझे रुप एकच आहे, असे विठ्ठल त्याला सांगतो.त्यानंतर सोनार हा विठ्ठलच्या कमरेला सोन्याचा पट्टा बांधून विठ्ठलच्या चरणी नस्तमस्तक होतो, हा प्रसंगदेखाव्यात दाखविण्यात आला. विठ्ठल मंदिराजवळ हा देखावा आला असता ढोल, ताशा, टाळांच्या गजरात महिला व पुरुषांनी गोल रिंगण करून अभंग म्हटले. त्यामुळे मंदिर परिसर विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमला. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांना गर्दी केली होती. हा देखाव्या क्षण अनेकांनी मोबाईलमध्ये शूट केला.
या देखाव्यात विठ्ठलाची भूमिका अद्वैत पेडणेकर, शिवशंकराची भूमिका आराध्य कांबळी, नरहरी सोनाराची स्वरांश रेवडंकर तर वारकºयांची भूमिका गौरांक सावंत, त्रिशा सावंत, स्वर कांचवडे, स्वयम गावडे यांनी साकारली होती. हा देखावा साकारण्यासाठी नंदकुमार हजारे, प्रवीण चिंदरकर, अनंत हजारे, तनोज कळसुलकर, धीरज मेस्त्री, अनिकेत कांबळी, आबा मेस्त्री, मंथन हजारे, नील लोकरे, हर्ष हजारे व श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर व्यवस्थापन समितीने मेहनत घेतली. बुधवारी सकाळी विठ्ठल-रखुमाईची पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी मंदिरात भाविकांनी महाप्रसाद लाभ घेतला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!