23.5 C
New York
Wednesday, August 6, 2025

Buy now

कासार्डेत प्रमोद जठार मित्रमंडळातर्फे लाखाची दहीहंडी

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची समजल्या जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने शनिवार, १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत गोपाळकाल्यानिमित्त कासार्डे तिठा येथील महामार्गनजीक पटांगणामध्ये भव्य ‘कोकण दूध चषक’ दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडीसाठी विजेत्याला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

कार्यक्रमला माजी केंद्रीयमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, भाजप प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण, राज्याचे बंदरविकास तथा मत्स्योद्योग विकासमंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आदींसह भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार व दोन्ही जिल्ह्यातील विविध भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

प्रमोद जठार मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवाचे हे १३ वे वर्ष आहे. दहीहंडी उत्सवानिमित्ताने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्गसह रत्नागिरी-जिल्ह्यातील गोविंदा पथकांना सहभागी होता येणार आहे. ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना या दहीहंडी उत्सवात सहभागी होता यावे, त्यांनाही आनंद, उत्साह व आपले कौशल्य दाखविता यावे, त्यांना प्रोत्साहन व बक्षिसे मिळविता यावीत या उद्देशाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यातील या गोविंदा पथकांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

रुपये याप्रसंगी आठ थरांचे मनोरे रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ व आकर्षक कोकण दूध चषक देण्यात येणार आहे. तर चार थरांची सलामी देणाऱ्या पथकांना ३,३३३ रुपये, पाच थरांसाठी ४,४४४ रुपये, सहा थरांसाठी ५,५५५ रुपये तर सात थरांसाठी ६,६६६ रुपये व प्रत्येकी आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

यावेळी दुपारी २.३० वा. स्थानिक प्रतिष्ठीत मानकरी व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हस्ते दहीहंडीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे.

सायंकाळी ४ वाजल्यानंतर कोल्हापूर येथील उमर मुल्ला प्रस्तुत ऑर्केस्ट्रा तुफान मेलडीज हा ऑर्केस्ट्रा होणार आहे. यामध्ये जुन्या नव्या मराठी, हिंदी रिमिक्स, दिलखेचक लावण्या, अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, स्पेशल लेझर शो, नेत्रदीपक लाईट इफेक्टस, नृत्यगितांचा व्हरायटी शो असणार आहे.

ड्रॉ कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांसाठी लकी कुपन आकर्षक भेटवस्तूचे ठेवण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी प्रमोद जठार मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव (९४०३२८९००५), रोहित महाडीक, भाजप कार्यालय कासार्डे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!