मुंबई – गोवा महामार्गावर झाला अपघात
ओरोस : मुंबई – गोवा महामार्गावर खालसा धाब्यासमोर मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक दिल्याने ओरोस वर्देरोड येथील मोपेडवर मागे बसलेल्या शमिका शशांक पवार ( वय २७ ) या जागीच मृत झाल्या आहेत. तर मोपेड चालक शशांक प्रकाश पवार ( वय. ४० ) व त्यांचे चार महिन्याचे बाळ पवित्रा पवार व साडेतीन वर्षाच्या प्रभास पवार हा सुदैवाने बचावला. हा अपघात सोमवारी १२:३० वा. च्या सुमारास झाला.
घटनेची माहिती मिळताच ओरोस पोलीस, महामार्ग पोलीस यांच्यासह कसाल सरपंच राजन परब घटनास्थळी पोहोचले. आपघातातील जखमीना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.
गोव्याहून – मुंबईच्या दिशेने जात असताना कणकवलीच्या दिशेने जाणारे शशांक पवार यांनी महामार्गावर विरोधी दिशेकडील दुसऱ्या लेन कडे जाण्याचा आकस्मिक प्रयत्न केला. त्यामुळे या कारची धडक पवार यांच्या सुझुकी मोपेडला बसली. मोपेडच्या मागे असलेल्या शशांक पवार यांच्या पत्नी शमिका पवार या धडकेत रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. तर मोपेडस्वार शशांक पवार व मयत झालेल्या शमिका पवार यांच्या हातात असलेली चार महिन्यांची पवित्रा व मध्ये बसलेला साडेतीन वर्षाचा मुलगा प्रभास हा सुदैवाने बचावला.
याप्रकरणी ईरटीका गाडीचा चालक राहुल शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.