कास गावात राजकीय वातावरण तापले
सरपंच, उपसरपंच सक्षम असल्याचे म्हणणे
बांदा : कास गावात गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागली असतानाही काही ग्रामस्थांनी विकास प्रक्रिया थांबल्याचा दावा करत शिवसेना जिल्हाप्रमुखांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र गावातीलच विठ्ठल पंडित आणि जयवंत पंडित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या दाव्यांना जोरदार प्रत्युत्तर देत जलजीवन प्राधिकरण आणि रेखवाडी-कास रस्ता कामाला विरोध करणारेच आता विकासकामांसाठी चर्चा करायला जात असल्याचा आरोप करत ही बाब हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.भाजप नेते खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून कास गावात अनेक विकासकामे झाली आहेत, असे असतानाही काही जण विकास थांबल्याचा ‘कांगावा’ करत असल्याचा आरोप पंडित बंधूंनी केला आहे. त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सत्य परिस्थिती नेमकी वेगळी आहे. जी मंडळी आज विकासकामांची चर्चा करण्यासाठी गेली आहेत, तीच मंडळी गावातील जलजीवन प्राधिकरणची कामे अडवत आहेत. इतकेच नव्हे तर, रेखवाडीतून कास गावात येणारा महत्त्वाचा रस्तासुद्धा याच ग्रामस्थांनी अडवला आहे.गावातील विकासकामे थांबल्याचा हा दावा “अल्पसंतुष्ट ग्रामस्थ” करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंडित बंधूंनी स्पष्ट केले की, कास गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे सक्षम आहे. गेल्या दोन वर्षांत गावात विक्रमी विकासकामे झाली आहेत. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणीही अनावश्यक ढवळाढवळ करू नये, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला आहे. या प्रकरणामुळे कास गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.