कणकवली : तालुक्यातील कनेडी दशक्रोशीतील वीज ग्राहकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांगवे येथील महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. तसेच गणेश चतुर्थी सणापूर्वी वीज वाहिन्यांच्या सर्व समस्या दूर करून गणेशोत्स कालावधीत वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी नागरिकांनी फॉल्टी मिटर असल्याने विद्युत बिले जास्त प्रमाणत येतात. स्मार्ट मिटरला आमचा विरोध आहे. जुलै महिन्यात आलेली वाढीव बिले कमी करण्यात यावी. लाईनमन ग्राहकांचे फोन उचलत नाहीत. सांगवे बांदवाडी येथील ट्रान्सफार्मरवरून जिओच्या टॉवर ला विद्युत पुरवठा केल्याने कमी दाबाची वीज मिळते. नाटळ गाव भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्याने दोन लाईनमन देण्यात यावेत. दिगवळे व दारिस्ते गावासाठी स्वतंत्र लाईनमन देण्यात यावा. सांगवे कनेडी बाजारपेठ मधील लाईनमनच्या कामात सुधारणा न झाल्यास त्याची बदली करावी. सांगवे घोसाळवाडी येथे नवीन ट्रान्सफार्मर बसवावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी ५ ऑगस्ट पर्यंत कारभारात सुधारणा झालेली दिसेल, असे आश्वासन दिले. महावितरणच्या वतीने कार्यकारी अभियंता सौरभ माळी, उपकार्यकारी अभियंता संदीप पाटील, सहाय्यक अभियंता अविनाश तावडे, अमोघ थोरबोले तर भाजपच्यावतीने माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, माजी प.स. सदस्य राजू पेडणेकर, सांगवे सरपंच संजय उर्फ बाबु सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर, दारिस्ते उपसरपंच संजय सावंत, दिगवळे उपसरपंच तुषार गावडे, अमेय सावंत, राजू सापळे, तसेच वीज ग्राहक उपस्थित होते.
सध्या वीज ग्राहकांना आलेली वाढीव वीजबिले, फॉल्टी मिटर या संदर्भातल्या समस्या जाणून घेण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सांगवे कनेडी येथील महावितरण कार्यालय येथे वीज ग्राहकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ज्या वीज ग्राहकांच्या तक्रारी असतील त्यांनी मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत व कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी केले आहे.