दोघेही तरुण उत्तरप्रदेशमधील
एकावर ब्लेडने वार ; दोघांना अटक
कणकवली : मूळ उत्तर प्रदेशमधील तर जानवली ( ता. कणकवली ) येथे राहणाऱ्या चौघा तरूणांमध्ये हाणमारी झाली. यात एका तरूणावर ब्लेडने वार करून त्याला जखमी करण्यात आले. या प्रकरणी तिघा आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांना आज ताब्यात घेण्यात आले. ही घटना काल (ता. २९) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली.
जानवली वाकाडवारी येथे कल्लू रस्पाल निसाद (वय २६), प्रेमचंद निसाद (वय ३५), संतराम निसाद (वय ३८), पवन निसाद (वय ३५) हे एकत्र राहतात. हे सर्वजण पुठ्ठा गोळा करून तो घाऊक विकण्याचे काम करतात. काल २९ रोजी सकाळी नऊ वाजता कल्लू याने उर्वरीत तिघांना घरातील भांडी घासणे आणि घरची सफाई करणे अशी कामे सोपवली आणि तो पुठ्ठा गोळा करण्याच्या कामाला निघून गेला. रात्री साडे नऊ वाजता तो पुन्हा घरी आला तेव्हा घरातील भांडी धुतलेली नव्हती. घराची सफाई देखील करण्यात आली नव्हती. या मुद्द्यावर कल्लू आणि त्याच्या तीन साथीदारांमध्ये जोरदार भांडण झाले. यात प्रेमचंद निसाद याने कल्लू याच्या शर्टाच्या कॉलरला पकडून कल्लूला हाताने गालावर, डोक्यावर ठोशाने मारून खाली पाडले. त्यानंतर पवन निसाद हा ब्लेड घेऊन आला. या ब्लेडचा एक तुकडा त्याने स्वतःकडे ठेवला तर दुसरा तुकडा संतराम निसाद याच्याकडे दिला. पवन याने कल्लू याच्या उजव्या गालावर ब्लेड मारून दुखापत केली. तर संताराम निसाद याने त्याच्याकडील ब्लेडने कल्लू याच्या डाव्या खांद्यावर, डाव्या कुशीवर मारून दुखापत केली.
कल्लू निसाद याला त्याच्या अन्य नातेवाईकांनी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तर कल्लू याने रात्री उशिरा त्याला झालेल्या मारहाणीची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार दोघा आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११५ (२), ११८ (२), ३ (५), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.