पालकमंत्री नाम. नितेश राणे लोकांच्या पसंतीस उतरले आहेत
नाईक यांनी जिल्ह्यतील गोष्टी पाहण्यापेक्षा स्वतःच्या वॉर्डमधील समस्या सोडवाव्या
युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचे नाईक यांना प्रत्युत्तर
कणकवली : पालकमंत्री ना. नितेश राणे निष्क्रिय असल्याची टीका करणारे सुशांत नाईक, वैभव नाईक यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक हे निष्क्रिय ठरल्याने जनतेने त्यांना घरी बसवले आहे. तसेच आम्हाला नितीमत्तेच्या गोष्टी सांगणाऱ्या नाईकांच्या मांडीला मांडी लावून परशूराम उपरकर बसतात. तेव्हा त्यांची नीतिमत्ता कुठे जाते असा सवाल भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी आज उपस्थित केला. येथील राणे संपर्क कार्यालयात श्री.मेस्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली.
त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस पप्पू पुजारे, तालुकाध्यक्ष सहदेव खाडये, तालुका सरचिटणीस प्रज्वल वर्दम, शहराध्यक्ष सागर राणे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत राणे आदी उपस्थित होते.
श्री. मेस्त्री म्हणाले, नाईक यांना माझा असा एक प्रश्न आहेत. ना. नितेश राणे हे जर निष्क्रिय ठरले तर त्यांचे प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढत का चालले आहे. याचाच अर्थ जिल्ह्यातील मतदारांच्या, जनतेच्या ते पसंतीस उतरले आहेत. एकदा निवडून आल्यानंतर ते मताधिक्य टिकवणे जिकरीचे असते, पण नितेश राणे यांच्या मताधिक्यात सातत्याने वाढ होत आहे. या उलट वैभव नाईक, विनायक राऊत हे खरे निष्क्रिय ठरले. यामुळे त्यांचा पराभव झाला. खंर तर सुशांत नाईक यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद मिळावे यासाठी आपल्या भावा विरोधात काम केलं. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नये.
श्री.मेस्त्री म्हणाले, भाजप हा खूप मोठा पक्ष आहे. पण शिवसेनेत केवळ पाच नेते आणि निवडक कार्यकर्ते शिल्लक राहिले आहेत. यात आता संदेश पारकरही बाजूला झाले आहेत. दुसरीकडे जीजी उपरकर हे काही पक्ष वाढविण्यासाठी प्रवास करताहेत, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे पदाधिकारी जाहीरपणे नाराजी उघड करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यानी जो शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला. यात राज्याच्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये सिंधुदुर्ग आला. सातत्याने जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न सोडविणारे आमचे नेते ना. नितेश राणे आहेत. त्यांना तुम्ही निष्क्रिय कसे काय म्हणू शकता. खरं तर सुशांत नाईक यांनी ते राऊत की नाईक गटाचे हे आधी जाहीर करायला हवे. वैभव नाईक हे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना नीतिमत्ता होती असे सांगतात. पण ज्या परशूराम उपरकर यांना तुम्ही शिवसेनेत घेतले, त्यावेळी तुमची नीतिमत्ता कुठे होती. तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. त्यावेळी नीतिमत्ता कुठे जाते? नुकताच कै. श्रीधर नाईक यांच्या स्मृतीदिनाचा कार्यकम झाला. यात शिवसेनेचे सगळे नेते होते. त्यावेळी परशूराम उपरकर का नव्हते? असेही श्री.मेस्त्री म्हणाले.
*बॉक्स*
ती तुमच्या पराभवाची कारणे ठरू शकतात…
नगरपंचायत च्या निवडणुकीत तुम्ही ज्या वॉर्ड मधून उभे राहिलात तिथे तुंबलेली गटारे तिथे वाढवलेले रान आणि तेथील समस्या पहिल्या सोडवा आणि नंतरच पालकमंत्री नामदार नितेश राणे त्यांच्यावर टीका करा. पुढे काही दिवसात नगरपंचायत निवडणूक आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्ही आमदारकीचे स्वप्न पाहिले होते. परंतु पुढे आता विधानसभेची निवडणूक नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून तुम्ही दूर आहात परंतु नगरसेवक म्हणून निवडून येण्याची तयारी आतापासून सुरू करा. नाहीतर आपल्या वॉर्डमध्ये वाढलेल्या रान आणि तुंबलेला गटार तुमच्या पराभवाची कारणे ठरू शकतात, असा सल्ला देखील संदीप मेस्त्री यांनी दिला आहे.