भाजपचे कार्यकर्ते घेतल्यास खुशाल परत घेऊन जा
मालवण : आम्ही भाजपचे कोणतेही कार्यकर्ते फोडलेले नाहीत. कोणालाही आमिष दाखवले नाही. आमदार निलेश राणे यांनी भाजपमध्ये असताना जे कार्यकर्ते निर्माण केले तेच कार्यकर्ते राणे यांच्याशी असलेले नाते जपत शिवसेनेत आले. तरीही नकळत भाजपचा पदाधिकारी व कार्यकर्ता शिवसेनेत आला असल्यास भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांना परत भाजपात घेऊन जावे, आमचे टार्गेट फक्त ठाकरे शिवसेना असून नारायण राणे यांच्यावर टीका करून राजकीय पोळी भाजणाऱ्या ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांना आम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला. येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी दत्ता सामंत यांच्यासमवेत शिवसेना शहराध्यक्ष दीपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, राजू बिडये, अरुण तोडणकर, महेश सारंग, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले, ठाकरे शिवसेनेचे सुशांत नाईक व वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांना अकार्यक्षम म्हटले, मात्र नितेश राणे यांनी पक्षाचे चांगले काम केले आहे, विकासात्मक काम केले, म्हणूनच एवढ्या लहान वयात ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत. सध्या भाजप शिवसेनेत काय चालले आहे त्याचा फायदा मिळेल असे नाईक यांना वाटत असेल तर तसा फायदा मिळणार नाही. सुशांत नाईक, वैभव नाईक किंवा ठाकरे शिवसेनेचे कोणीही असतील त्यांनी कोणीही नारायण राणे यांच्यावर आरोप करू नये. या जिल्ह्यातून राणे यांना कोणी हटवू शकत नाही. राणे ज्या पक्षात आहेत तो पक्ष एक नंबर राहील, राणे जे सांगणार तेच आम्ही करणार. संधीचा फायदा घेऊन पालकमंत्र्यांवरही टीका करून भडकवण्याचे काम कोणी करू नये, असेही सामंत म्हणाले. मी कोणालाही आमिष दाखवले नाही, आमिष दाखवले असते तर मालवण व कुडाळचे नगरसेवक आमच्याकडे आले असते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून संपर्कात आले. त्यावेळी त्यांनी मला सहकार्य केले, त्यांनी जे शब्द दिले ती कामे पूर्ण करण्याचे काम मी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे असे सर्व आम्ही महायुती म्हणून एकसंघ आहोत असेही सामंत यांनी स्पष्ट केले. आमचे टार्गेट ठाकरे शिवसेना आहे. ठाकरे शिवसेनेचे काही नेते राणेंवर खोटे आरोप करून, त्यांच्याविषयी खोटे बोलून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत असून त्यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. भाजपचा आम्ही कोणताही कार्यकर्ता फोडलेला नाही किंवा आमच्या पक्षात घेतला नाही, तरीही नकळत भाजपचा कार्यकर्ता शिवसेनेत आला असेल तर भाजप जिल्हाध्यक्षांनी त्याला पुन्हा भाजपात घेऊन जावे. आमच्या पक्षातील जरी कोण नाराज असतील व त्यांना मित्र पक्ष म्हणून भाजपात जावेसे वाटले तर खुशाल जावे, आमची हरकत नाही, आमचा पक्ष फोडतोय असेही मी म्हणणार नाही. माझ काम चुकीचे वाटत असेल तर पक्षाने मला काढून टाकावे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. गेल्या चार पाच वर्षात आमदार निलेश राणे मालवण कुडाळ मतदार संघात काम करत आहेत. आम्हीही त्यांच्यासोबत भाजप मध्ये काम करत होतो. विधानसभा निवडणुकीत मालवण कुडाळ मध्ये महायुतीमधून उमेदवार म्हणून निलेश राणे यांच्याशिवाय दुसरे नाव नव्हते. निलेश राणे यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते, पण भाजपच्या धोरणानुसार ते मिळाले नाही, तेव्हाच जरा निलेश राणे यांना भाजपने तिकीट दिले असते तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोला दत्ता सामंत यांनी लगावला. आज निलेश राणे शिवसेनेतून काम करत असले तरी त्यांनी भाजप मध्ये असताना जे कार्यकर्ते निर्माण केले त्यांच्याशी चांगले नाते आहे. आज निलेश राणे यांचे काम बघून व नाते जपण्यासाठी कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे भाजपचा कोणताही कार्यकर्ता आम्ही हलविला नाही, किंवा दमदाटी केली नाही आणि करणारही नाही, तसेच आम्ही दांडी किनारपट्टीवर गेलो नाही, आमिष दाखवून किंवा पैसे देऊन प्रवेश केला असे काहीही झाले नाही, असेही सामंत यांनी सांगितले. माझे वैयक्तिक गुरु हे खासदार नारायण राणे आहेत, मी कोणत्याही पक्षात असलो तरी राणे यांच्या पलीकडे मला काही माहित नाही, त्यांनी मला जिल्ह्यात नावारूपाला आणले, मला घडवले आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे नाव माझ्या हातून कुठेही कमी होणार नाही. महायुतीच्या माध्यमातून राणे जी काही गोष्ट सांगतील ती माझ्याकडून अंमलात येईल, मी सामाजिक बांधिलकी ठेवून निलेश राणे यांना अभिप्रेत असलेले काम करत आहे, जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम करत आहे. राणे यांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार मी काम करत आहे, ते मागतील ती गुरुदक्षिणा द्यायला मी तयार आहे. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याची हिंमत कोणाचीही नाही, असेही सामंत म्हणाले. तसेच येत्या नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाला किती जागा द्यायचे हे नारायण राणेनी सांगितल्यावर आम्ही कुठेही बंडखोरी करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.