कणकवली : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत कणकवली बसस्थानकाच्या स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यासाठी मंगळवारी समिती आली होती. या समितीने कणकवली व फोंडा बसस्थानक परिसराची पाहणी केली. कोल्हापूर आगारातील एसटीचे अधिकारी श्री. नागतोडे, श्री. भोसले यांनी कणकवली व फोंडाघाट बसस्थानक परिसर स्वच्छ आहे की नाही? याची पाहणी केली.
स्थानक परिसरातील स्वच्छतागृहांची पाहणी केली. कणकवली बसस्थानक परिसरातील पाहणी करतेवेळी आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, सहाय्यक वाहतूक नियंत्रण अजित कदम, शिवाजी राठोड, श्रीनिवास कदम, वरिष्ठ लिपिक दिलीप जाधव, बाबू मुळदेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
फोंडाघाट बसस्थानक येथे पाहणी करतेवेळी वाहतूक नियंत्रक गपू राठोड, संजू पवार, दिलीप जाधव उपस्थित होते. दोन्ही बसस्थानकांची पाहणी केल्यानंतर एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना टीमने काही सूचना केल्या. फोंडाघाट बसस्थानक परिसरातील खड्डे बुजविण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी फोंडाघाट स्टँडवर गायकवाड आगार व्यवस्थापक यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वच्छता समितीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकार संजय सावंत, कुमार नाडकर्णी, रिक्षा युनियनचे गजानन पारकर, सतीश जाधव, संदेश मेस्त्री, सचिन परब, रवी बंदरकर, संजय पाटील, संतोष जाधव, विनायक भोगटे इत्यादी ग्रामस्थ, व्यावसायिक उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी फोंडाघाट, पाली आणि सावंतवाडी या सगळ्यात जुन्या आणि ऐतिहासिक वारसा जपलेल्या एसटी स्थानकाचा इतिहास विशद केला.
यावेळी उपस्थितांनी स्टॅन्ड वरील विविध घटनांच्या वेळी प्रवासी आणि ग्रामस्थांचे सदैव सहकार्य लाभते असे सांगितले. स्वच्छता समितीने समाधान व्यक्त करून पुढे प्रयाण केले.