कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी नागपंचमी सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मातीच्या नागदेवतेच्या मूर्तीची पूजा करून त्यांना दुध – लाह्याचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. नागपंचमीच्या दिवशी विशेषतः महिलांनी उपवास करून नागदेवतेची पूजा केली.
सिंधुदुर्गातील अनेक ठिकाणी पुरातन नागदेवतांचे स्थान असून या स्थळी नागपंचमी दिवशी सकाळपासूनच पूजेसाठी गर्दी दिसून आली. मंदिर परिसरात पारंपरिक पोशाखातील महिला, मुली, वयोवृद्ध यांनी मनोभावे पूजा केली. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर भजन, कीर्तन व कुटुंब एकत्र येऊन सण साजरा करण्यावर भर दिला जातो. नागपंचमीचा हा पारंपरिक सण ग्रामीण संस्कृती आणि निसर्गाशी असलेली नाळ अधोरेखित करतो.
नाग हा पिकाला नुकसानकारक असणाऱ्या उंदरांना खातो. त्यामुळे तो शेतकऱ्याचा मित्र आहे. त्याचे महत्त्व आणि पर्यावरणातील त्याचे स्थान अधोरेखित करणारा सण म्हणजे नागपंचमी. मात्र नागपंचमीच्या दिवशी एका दिवशी नागाचे पूजन करून बाकीच्या दिवशी त्याच्याशी शत्रुत्व ठेवून त्याचा जीव घेणे हे चुकीचे असून नाग तसेच इतर सापाच्या प्रजाती आणि त्याचे पर्यावरणातील महत्त्व समजून घेणे आणि सर्पमित्रांच्या माध्यमातून ते समाजासमोर येणे महत्त्वाचे आहे. तरच या सणांचे आणि निसर्गाचे महत्त्व टिकून राहील.