21.3 C
New York
Sunday, September 14, 2025

Buy now

उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना विचारला जाब

कुडाळ कार्यालयावर मनसेची धडक, ढिसाळ कारभाराचा निषेध

कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी नाराजी व्यक्त केली. परब यांनी सोमवारी मनसे पदाधिकाऱ्यांसह थेट राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या हार बाटल्यांचा निरीक्षकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिक निषेध या प्रकारे त्यांनी केला. त्याची चर्चा रंगली होती.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ तालुक्यात अवैध दारू विक्रीची ठिकाणे आणि त्यामागे कार्यरत असलेल्या यंत्रणांची सविस्तर माहिती चार महिन्यांपूर्वी पत्र देऊन राज्य उत्पादनशुल्कच्या अधिकाऱ्यांना दिली होती. परंतु, चार महिने उलटूनही कारवाई न होता. राजरोसपणे गोवा बनावटीची दारु विक्री सुरूच राहिली. म्हणून हे आंदोलन करण्यात आले. सोमवारी अवैध दारु विक्रेत्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाकडे नव्याने देण्यात आली. सात दिवसात धंदे बंद न झाल्यास जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या दालनात आंदोलन करणार येईल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे, गजानन राऊळ, अविनाश अणावकर, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, शाखाध्यक्ष अनिकेत ठाकूर, महाराष्ट्र सैनिक सुरज नेरूरकर, विष्णू मसके, वल्लभ जोशी, रोशन ठाकूर आणि अजय जोशी आदी उपस्थित होते. मनसेच्या या आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!