22.5 C
New York
Sunday, July 27, 2025

Buy now

कणकवली रेल्वे स्थानकातील समस्या तातडीने सोडवणार

रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक मधुकर मातोंडकर यांचे आश्वासन

रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी समस्यांचा वाचला पाढा

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांतील समस्या वाढत होत्या. याची पहाणी करण्यासाठी व रेल्वे प्रवासी संघटनेशी चर्चा करण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक मधुकर मातोंडकर, इंजिनिअर जेपीप्रकाश, एरिया सुपरव्हायझर विजय पालव हे कणकवली रेल्वे स्थानकात शनिवारी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकातील समस्यांची पाहणी केली. पहाणी दरम्यान रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्यासमोर रेल्वे स्थानकामधील समस्यांचा पाढा वाचला. यावर समस्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन श्री. मातोंडकर यांनी दिले.

१ ऑगस्टपूर्वी सिंधुदुर्ग हद्दीतील रेल्वे स्थानकांतील समस्या मार्गी न लागल्यास १५ ऑगस्ट रोजी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुरेश सावंत यांनी दिला.

मधुकर मातोंडकर, जेपीप्रकाश, विजय पालव यांनी कणकवली रेल्वे स्थानक परिसरातील समस्यांची पाहणी केली. दरम्यान त्यांना प्लॅटफॉर्म जवळ रान वाढल्याचे दिसून आले. अपुऱ्या शेड अभावी प्रवाशांना पावसात भिजत रहावे लागते, रेल्वे स्थानक परिसरात पंखे नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांसाठी बसण्यासाठी असलेल्या शेडच्या छप्परला गळती लागल्याने आसन व्यवस्थेवर पाणी असते. त्याठिकाणी रान वाढल्याने प्रवाशांना बसता येत नाही. यासह अन्य समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या.

त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर रेल्वे स्थानक परिसरातील समस्यांचा पाढा वाचला. फ्लॅटफार्मवर वाढलेले रान कापण्याचे काम लवकर हाती घेण्यात येईल, पंखे बसविण्यात येतील, सद्य स्थितीत कणकवली रेल्वे स्थानकात एक नंबर फ्लॅटफार्मवर १५० मीटर लांबीचे छत आहे. मात्र, दुसऱ्या फ्लॅट फार्मवर २०० मीटर छत बांधण्यास मंजूरी मिळाली आहे. हे छत उभारणीचे काम लवकरच हाती घेतले जाईल. तसेच रेल्वे स्थानकात उतरता जिना बसविण्याचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कणकवली रेल्वे स्थानक परिसरातील फ्लॅटफार्मवर शेवाळ आणि पाणी साचत असल्याने प्रवाशांचे अपघात होण्याची शक्यता आहे. प्रवाश्यांच्या तुलनेत स्वच्छतागृहे अपुरी पडत आहेत. स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता नसते, तिकिट घरे कमी आहेत, छताला गळती लागली आहे, यासह अन्य समस्या सुरेश सावंत, संजय मालंडकर, श्री. वाळके यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. प्रवाशांनी अधिकाऱ्यांना काही प्रश्नही विचारले. ते प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी संतोष सावंत, महेश कदम, संतोष राणे यांच्यासह रेल्वे प्रवाशी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, अधिकाऱ्यांच्या टीमने खारेपाटण, नांदगाव रेल्वे स्थानकाची पाहणी केली. रेल्वे स्थानकातील समस्यांबाबत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी घेत रेल्वे स्थानकांतील समस्यांचा पाहणी करण्याची सूचना कोकण रेल्वे प्रशासनाला केली होती. त्यानुसार रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे तपासणी पथक कणकवलीत दाखल झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!