समस्या मार्गी लावण्याची जिल्हाधिकारी व जिल्हा नगरविकास अधिकारी यांची ग्वाही
मालवण : शहरातील विविध समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण मधील पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या समवेत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेतली. यावेळी संबंधीत समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार नगरपरिषदे अंतर्गत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी गुरुवार ३१ जुलै रोजी मालवण नगरपरिषद येथे आढावा बैठक घेण्याचे जिल्हा नगरविकास अधिकारी यांनी यावेळी मान्य केले. तर इतर समस्या मार्गी लावण्याची ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मालवणध्ये मत्स्यआयुक्त अधिकारी कायम स्वरूपी नसल्याने किनारपट्टी भागातील मच्छीमारी करणाऱ्या लोकांना अनेक सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. शहरात पोलीस पाटील पद नेमलेले नसल्याने नागरिकांना वारस तपास दाखला व अन्य समस्या उदभवत आहेत.शहराच्या विकासासाठी मालवण नगरपरिषद येथे कायम स्वरूपी मुख्याधिकारी यांची नेमणूक करावी. मालवण शहरातील बंदर जेटी येथे रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्या कामाची सखोल चौकशी करून ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी मालवण नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती महेंद्र म्हाडगुत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, दांडी उपशहर प्रमुख हेमंत मोंडकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.