नारायण ठाकूर यांच्यासमोर निवाऱ्याचा प्रश्न ; मदतीचे आवाहन
सावंतवाडी : गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे माडखोल-ठाकुरवाडी येथील नारायण ठाकूर यांचे राहते घर जमीनदोस्त झाले आहे. ऐन पावसाळ्यात निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने, अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या नारायण ठाकूर यांना समाजातील दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांकडून मदतीची गरज आहे. घराचा एक भाग कोसळला त्यावेळी नारायण ठाकूर घराच्या एका बाजूला झोपलेले असल्यामुळे ते थोडक्यात बचावले. या दुर्घटनेत त्यांच्या घराचे छत, वासे, रीप आणि भिंती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेमुळे ठाकूर यांना मोठा धक्का बसला असून, माडखोल ग्रामस्थांनी त्यांची तात्पुरती सोय केली आहे. मात्र, ही सोय कायमस्वरूपी नसल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवणेकर यांनी नारायण ठाकूर यांना तातडीने १० हजार रुपयांची मदत करून त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ठाकूर यांची आर्थिक स्थिती अत्यंत गरिबीची असून, त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे या कठीण काळात त्यांना आधार देण्यासाठी समाजातील दाते आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन मदत करावी, असे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी नारायण शिवराम ठाकूर बँक: बँक ऑफ इंडिया शाखा: माडखोल खाते क्रमांक: १४९११०११०००३९५५ आयएफएससी कोड (IFSC Code): BKID0001491 या ठिकाणी मदत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.