मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय : मंत्री नितेश राणे
मुंबई: इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशन मधील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मंत्रालयात भेट घेऊन पावसाळी मासेमारी बंदी कालावधी गुजरात राज्याच्या धर्तीवर १५ ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी केली.
गुजरात राज्याने पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १ जून ते १५ ऑगस्ट केल्याने शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्याने मासळी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्ट पर्यंत करण्याचा जोर सर्व पारंपारिक मच्छीमारांकडून धरू लागली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात वादळी वारे मोठ्या प्रमाणात होत असतात ज्यामुळे समुद्र खवळलेला असतो ज्यामुळे मच्छिमारांची जीवित हानी तसेच नौकांचे नुकसानी टाळण्याकरिता पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्ट पर्यंत करण्याची रास्त मागणी उपस्थित मच्छिमारांकडून करण्यात आली आहे.
मंत्री नितेश राणेंनी सदर मागणी योग्य असल्याचे उपस्थित मच्छिमारांना सांगून गुजरात राज्याच्या धर्तीवर पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्ट पर्यंत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे आश्वासन मच्छिमार शिष्टमंडळाला दिले. तसेच पुढील आठवड्यात गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ केंद्रीय मत्स्यवयसाय मंत्र्यांना भेटून संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पुढील वर्षापासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे उपस्थित कोळी बांधवांना आश्वासन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रातून फेडरेशनचे प्रतिनिधी श्री.देवेंद्र दामोदर तांडेल (मुंबई), संजय कोळी, विनोद पाटील, नयना पाटील आणि गुजरात राज्यातून वेलजीभाई मसानी, भगूभाई सोलंकी, राकेशभाई कुवारा, कन्हैयालाल सोलंकी, सुनिलभाई गोहेल, रामभाई सोलंकी, नरसी भाई बारया, रमेशभाई बदरशाही साहिल आदी मच्छिमार प्रतिनिधी उपस्थित होते.
०००