कणकवली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि कणकवली महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल हॉलमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे राज्यात १०० ठिकाणी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. रोजगार मेळाव्यासाठी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. हा रोजगार मेळावा बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील बेरोजगारांनी या रोजगार मेळावाचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी केले.
कणकवली महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान यावेळी व्यासपीठावर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, जिल्हा कौशल्य विभागाचे आमिण तडवी, जिल्हा व्यवसाय शिक्षण विभागाचे अनिल मोहरे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. हरिभाऊ भिसे, कणकवली ज्यु. कॉलेजचे पर्यवेक्षक श्री. माने आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे नाम. नितेश येणे म्हणाले, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना आपल्या जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होत आहे. महायुती सरकारचा रोजगार मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्यात रोजगारनिर्मिती व्हावी आणि परदेशी गुंतवणूक वाढीच्या दृष्टीने काम करत आहे. वाढवण बंदरामुळे कोकण पट्टयातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारांना वाढवण बंदर प्रकल्पामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता जिल्ह्यातील आयटीआयमध्ये कौशल्य प्रशिक्षण कोर्स लवकरच सुरू केले जाणार आहेत. हे कौशल्य प्रशिक्षण कोर्सचा लाभ विद्यार्थ्यांनी घेऊन वाढवण बंदरामुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील मंत्री नाम. नितेश राणे यांनी केले.
चेअरमन राजश्री सांळुखे म्हणाल्या, आताचे युग हे टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटचे आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजी व इंटरनेट वापराचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विषयक शिक्षण घेतले पाहिजे. भविष्यात कौशल्य आत्मसात केलेल्यांना अच्छे दिन येणार आहेत. युवा पिढी देशाचे भवितव्य असून त्यांनी विविध प्रकारची कला – कौशल्य शिकून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून देशाची मान उंचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य युवराज महालिंगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात भैय्याजी येरम यांनी रोजगार मेळावा घेण्यामागील शासनाचा उद्देश सांगितला. आरंभी सरस्वती मातेच्या मूर्तीला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.
शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने डॉ. राजश्री साळुंखे यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. आयोजकांच्यावतीने उपस्थित उद्योजकांच स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एम.एन.सावंत यांनी केले. या मेळाव्याला उद्योजक, तरुण – तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.