सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलैला कुडाळ येथे भव्य मुख्यमंत्री चषक जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनप्रेमींनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आणि भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात होणार आहे. स्पर्धेला सकाळी ९ वाजता सुरुवात होईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भजन मंडळांची निश्चिती २० जुलैला केली जाईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक भजनांप्रमाणे भजन सादर करावे लागेल, प्रत्येक भजन मंडळात १० ते १५ सदस्य असावेत. यासाठी प्रथम क्रमांक १५ हजार, द्वितीय क्रमांक: ११ हजार रुपये, तृतीय क्रमांक ९ हजार रुपये, उत्तेजनार्थ प्रथम ५हजार रुपये, उत्तेजनार्थ द्वितीय ४ हजार रुपये याशिवाय उत्कृष्ट तबलावादक, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट पखवाज वादक आणि उत्कृष्ट झांज वादक यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे विशेष बक्षीस दिले जाईल. भजन मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.