अर्चना घारेंना संधी देत होतो, मात्र प्रतिसाद मिळाला नाही
सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून स्वतःला विकायला ठेवलेल्यांना तिकीट देण्याची किंमत आम्हाला आता कळली आहे. त्यामुळे आता यापुढे ती चूक होणार नाही. ठाकरे शिवसेनेत खूप प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे यापुढे प्रामाणिक कार्यकर्त्यालाच संधी दिली जाईल, अशी हमी शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिली. दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अर्चना घारेंनी शरद पवार राष्ट्रवादीतून आमच्या ठाकरे शिवसेनेत यावे, असा प्रस्ताव खुद्द उद्धव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर ठेवला होता. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही, अन्यथा चित्र वेगळे दिसले, असते असे ते म्हणाले. आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेत आलेले काही जण आता पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत, याबाबत श्री. राऊत यांना छेडले असता ते बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही निष्ठावंतांना सोडून आयत्यावेळी पक्षात आलेल्यांना संधी दिली. मात्र आपल्या फायद्यासाठी ते आता बाजूला गेले आहेत. जिल्ह्यात काही लोकांनी स्वतःला विकायला ठेवला आहे, असे विकाऊ राजकारणी बाजारात मिळतात. माल विकायला ठेवतात तसे ते बाजारात उपलब्ध होतात. मात्र काही झाले तरी शिवसेनेत निष्ठावंतांची फळी कमी झालेली नाही. आजही निष्ठावान कार्यकर्ते तसेच कार्यरत आहेत. त्यामुळे विधानसभेला घडलेली चूक पुन्हा होणार नाही. यावेळी त्यांनी अर्चना घारे यांना उमेदवारी देण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, शरद पवार राष्ट्रवादी गटात असलेल्या घारे यांना ठाकरे शिवसेनेत प्रवेश घेऊन आम्ही तिकीट देतो, अशी आम्ही तयारी दर्शवली होती. मात्र काही झाले तरी आम्ही ही जागा राष्ट्रवादीला सोडणार नाही, असे सांगितले. याबाबतची चर्चा खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर जयंत पाटील असताना झाली होती. मात्र दुदैवाने तसा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुख बाळू परब, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, निशांत तोरसकर, गुणाजी गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.