कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांचे आवाहन
हयात प्रमाणपत्र लाभार्थ्याला देण्याचे प्रात्यक्षिक
कणकवली : केंद्र शासन पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक नवीन सुविधा विकसित करण्यात आली आहे. त्यामध्ये सत्यापन अॅपद्वारे लाभार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन तयार होणार आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.
कणकवली तहसिल कार्यालय येथे या सत्यपान अॅप नवीन प्रणालीच्या हयात प्रमाणपत्राचे प्रात्यक्षिक करुन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी संजय गांधी योजना नायब तहसिलदार गंगाराम कोकरे, अव्वल कारकुन डी.सी. सिंघनाथ, महसुल सेवक ए.ए. बागवे, महसुल कर्मचारी स्नेहा चव्हाण, प्रिया राजवाडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली तालुक्यात केंद्र पुरस्कृत योजनांचे एकूण लाभार्थ्यांपैकी ६६८ लाभार्थ्यांचे मार्च २०२५ अखेरचे हयात प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत. योजनेतील लाभार्थ्यांनी सत्यपान अॅप व्दारे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील तलाठी, पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य घ्यावे. “Beneficiary Satyapan App’ या नावाने एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे, ज्याद्वारे लाभार्थ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र म्हणजेच Digital Life Certificate (DLC) ऑनलाईन तयार करता येत आहे. या अॅपचा उपयोग करून, लाभार्थ्यांनी आपली हयात सर्टिफिकेट स्वतःच्या मोबाईलवरूनच करता येणार आहे. हे प्रमाणपत्र NSAP पोर्टलवर थेट लिंक होणार आहे. यामध्ये आधार प्रमाणिकरणाचा वापर करुन प्रक्रिया पार पाडली जाते. ज्यामुळे ही प्रक्रिया सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक आहे. या योजनांचे लाभार्थी स्वतः मोबाईलवरून, सेतू, महा ई सेवा केंद्र, तलाठी किंवा तहसील कार्यालयाच्या मदतीने ही प्रक्रिया करू शकतात, असेही श्री. देशपांडे यांनी म्हटले आहे.
*बॉक्स*
सत्यपान अॅप कसे डाऊनलोड करावे
यासाठी काय करावे? Google Play Store वरून खालील दोन अॅप डाऊनलोड कराः Aadhaar FaceRd App , Beneficiary Satyapan App Beneficiary Satyapan App ओपन करा, भाषा निवडा, Device Registration करा- आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल (ऐच्छिक) टाका, OTP टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा, Face Authentication करा मोबाईलचा कॅमेरा वापरून डोळ्यांची हालचाल करून सेल्फी घ्या, त्यानंतर Beneficiary Verification Certificate मिळेल, “तरी सर्व लाभार्थ्यांनी विनंती आहे की, आपण आपल्या हयातीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर ‘Beneficiary Satyapan App’ द्वारे ऑनलाईन तयार करून शासनाच्या योजनांचा लाभ सुरू ठेवा, असे आवाहन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.