मसुरे : मालवण तालुक्यातील सर्व संगीत, वारकरी भजनी बुवा, पखवाज वादक, तबलावादक, झांज वादक, किर्तनकार, कोरस, नवोदित कलाकार,अन्य भजनी क्षेत्रातील कलाकारांना नम्र विनंती करण्यात येते की आपल्या सर्वांची नुकतीच स्थापन झालेली “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग”हिला शासन दरबारी मान्यता मिळाली असून संस्थेचे कार्यकारी मंडळ व या क्षेत्रातील मान्यवर आपल्या भेटीसाठी व चर्चा विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा रविवार दिनांक 20 जुलै रोजी मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे मर्डे सभागृहात या संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मसुरे येथील प्रसिद्ध उद्योजक तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष डॉक्टर दीपक मुळीक परब, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक तथा ज्येष्ठ कामगार नेते श्री प्रकाश परब, भजन सम्राट तथा मानधन समिती सिंधुदुर्गचे सदस्य श्री भालचंद्र केळुसकर, माजी सभापती तथा मानधन समिती सिंधुदुर्ग चे सदस्य अजिंक्य पाताडे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कलाकार मानधन विमा योजना, कलाकार ओळखपत्र, भजन परंपरा संवर्धन व जतन, भजन कार्यशाळा मार्गदर्शन शिबिर घेणे, शासकीय योजना कलाकारांसाठी आहेत याविषयी शासन दरबारी पाठपुरावा करणे, नवीन सदस्य नोंदणी, ज्येष्ठ कलाकारांना मार्गदर्शन करणे, अशा विविध प्रश्नांसंदर्भात नियोजन करणे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन उपस्थिती दर्शवावी असे आवाहन भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष कानडे बुवा आणि या समितीच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी केले आहे.