सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठीच भाजपमध्ये प्रवेश- मंदार केणी…
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सबका साथ सबका विकास या भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला अनुसरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंदार केणी यांच्यासह येथील ज्या ज्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे, त्यांचे आम्ही स्वागत करतो. या प्रवेशामुळे मालवण शहर आणि तालुका भाजपची ताकद अजून वाढली आहे. खऱ्याअर्थाने सर्वसामान्यांशी नाळ जोडले गेलेले कार्यकर्ते आज भाजपावर विश्वास दाखवत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी धुरीवाडा प्रभाग बैठकीत केले. तर प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठीच आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे माजी नगरसेवक मंदार केणी यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष मालवण शहर प्रभाग क्रमांक १ व २ ची बैठक येथील आराध्य हॉटेल मध्ये झाली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहर तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, राजू आंबेरकर, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, भाई कासवकर, जयवंत कोळंबकर, प्रा. आर. एन. काटकर, शशिकांत खोत, नंदा सारंग, विनायक मयेकर, संगीता मालवणकर, रोहिणी मडये, रश्मी सारंग यांसह अन्य उपस्थित होते. चिंदरकर म्हणाले, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दर्शना कासवकर, सेजल परब आणि त्यांच्यासोबत भाजपवासी झालेले सर्व महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे लढाऊ बाण्याचे आहेत. पक्ष संघटना वाढीसाठी आणि आगामी काळातील निवडणुकांसाठी या कार्यकर्त्यांचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे. बाबा मोंडकर म्हणाले, महाराष्ट्रात उद्धव सेना जवळपास संपली आहे, जी काही उद्धवसेना शिल्लक आहे ती जनतेशी नाळ जोडलेल्या काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जीवावर शिल्लक आहे. अशाच सर्वसामान्य जनतेतून मोठे झालेल्या मंदार केणी आणि सर्वच भाजपवासी झालेल्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमुळे नवी ऊर्जा मिळणार आहे. नेतृत्वाला जो विश्वास दिला आहे तो विश्वास पूर्ण करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असून भविष्यात आपण सर्वांनी एकदिलाने पक्ष वाढीसाठी काम करूया. यावेळी बाबा परब यांनीही विचार मांडले. केणी म्हणाले, परिवारातील लोकांना बोलवून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी या प्रभागात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा येथील प्रभागात अनेक वर्ष रखडलेले रस्ते व अनेक विकास कामे प्रलंबित होती. नगरपालिकेच्या माध्यमातून येथील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमच्यावर याच कारणामुळे विश्वास दाखविला. भविष्यात जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपात येण्याचे त्यांनी आवाहन केले. शहरातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आज आपल्या मागे मोठी ताकद उभी आहे. शिवसेनेत असतो तर कदाचित नगरपालिकेत पुन्हा निवडून गेलो असतो. परंतु जनतेच्या कामासाठी जी पाठीशी ताकद आवश्यक असते ती ताकद उद्धव सेनेमध्ये मिळाली नसती.