कणकवली : शहरातील पटवर्धन चौकापासून अगदी काही अंतरावर व पोलीस ठाण्यापासून साधारणपणे तीनशे मीटर अंतरावर असलेल्या भालचंद्र ज्वेलर्सचे शटर अज्ञात चार चोरट्यांनी फोडून सुमारे दहा लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना बुधवारी पहाटे २:४० ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मंगेश सदानंद तळगावकर ( वय ५६ सध्या रा निम्मेवाडी कणकवली, मूळ करंजे ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
आचरा मार्गावरील रहदारीच्या ठिकाणी घटना घडल्याने अज्ञातांनी धाडसी चोरी केली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. लोखंडी हत्याराने दुकानाच्या शटर चे कुलूप तोडताना सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत.
भालचंद्र ज्वेलर्स चे मालक मंगेश सदानंद तळेगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, कणकवली शहरातील सना कॉम्प्लेक्स येथे आमचे भालचंद्र ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. (मंगळवारी मध्यरात्री ) बुधवारी पहाटे २:४० ते ३ वा. च्या सुमारास येथे राहणाऱ्या डॉक्टर संतोष केळकर यांनी आपला मुलगा गणेश तळगावकर याला फोन केला. खाली दुकानाचे कोणीतरी शटर तोडत आहे. आवाज येतोय, असे सांगितले. यावेळी गणेश तळेगावकर यांनी मोबाईल मध्ये लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावेळी त्यांना अज्ञात चार व्यक्ती दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून दुकानातील सामान पिशवीत भरत असल्याचे दिसले. लागलीच गणेश तळेगावकर यांनी दुकानाकडे धाव घेतली. घटनेची माहिती देखील कणकवली पोलिसांना दिली. मात्र तोपर्यंत चोरट्यांनी तिथून पळ काढला होता.
चोरीला गेलेल्या ऐवजात १५ किलो सोन्या – चांदीचे तसेच बेन्टेक्स चे व एक ग्रॅम सोने मिक्स असलेले दागिने, बाळ अंगठ्या, नवग्रह खड्यांचे पाकीट, जुनी लॉकेट मोड, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, माळ, चैन, ब्रेसलेट, कढा अशा सोन्या चांदीच्या वस्तू अज्ञात आणि लंपास केल्या आहेत.
कणकवली शहरात लागोपाठ चोऱ्यांचे सत्र वाढत आहे. त्यामुळे इतर घटनांपेक्षा चार चोरट्यांनी मुख्य चौकांत असलेल्या भालचंद्र ज्वेलर्सचे शटर तोडून धाडसी चोरी केली आहे. अज्ञात चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर एक प्रकारचे आव्हान बनले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पीएसआय पन्हाळे, महेश शेडगे, हवालदार विनोद चव्हाण, चंद्रकांत झोरे, पांडुरंग पांढरे, एलसीबी चे निरीक्षक प्रवीण कोल्हे, यांच्यासह ठसे तज्ञ, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. पन्हाळे करत आहेत.