देवगड : नाडण वरची पुजारेवाडी येथील उमेश सत्यवान पुजारे (३४) यांनी मद्यधुंद अवस्थेत आंबा फवारणीसाठी घरी आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. १४ जुलै रोजी सायंकाळी त्यांनी कीटकनाशक प्राशन केले होते परंतु उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय येथे १५ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
सत्यवान रघुनाथ पुजारे हे सोमवारी १४ जुलै रोजी आपली शेतातली कामे आटपून सायंकाळी घरी आले असता तेव्हा त्यांना आपला मुलगा मद्यधुंद स्थितीत घरी पडवीत बसलेला दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता उमेश याने आंबा कलम फवारणी करीता घरात आणून ठेवलेले कीटकनाशक प्राशन केल्याचे समजले. त्याचेवर देवगड ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालयात ओरोस येथे पुढील उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तो मृत झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
मयत हा विवाहित असून त्याला सात महिन्याचा मुलगा आहे. मयत याला दारूचे व्यसन होते . पण त्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.याबाबतची खबर त्याचे वडील सत्यवान रघुनाथ पुजारे (५०) नाडण वरची पुजारेवाडी यांनी देवगड पोलिसांना दिली.याबाबतचा अधिक तपास देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार आशिष कदम करत आहेत.