मालवण : नगरपालिकेतील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जिल्हा प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक मंदार केणी, उबाठा गटाचे मालवण पालिकेचे माजी बांधकाम सभापती यतिन खोत आणि माजी नगरसेविका दर्शना कासवकर व सेजल परब यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा हा विकासासाठी कटीबद्ध असून विकसित भारत आणि महाराष्ट्रासाठी योगदान देईल. या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळ सिंधुदूर्ग जिल्ह्यात भाजपा संघटनेला अधिक बळकटी मिळेल. पक्षात प्रवेश केलेल्यांचा यथोचित सन्मान राखला जाईल असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन आम्ही सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे श्री.केणी म्हणाले. निष्ठेने भाजपा वाढीसाठी काम करेन असेही ते म्हणाले.
या माजी नगरसेवकांबरोबरच उबाठा शाखा प्रमुख भाई कासवकर, नितीन पवार, संजय कासवकर व सई वाघ, उपशहर प्रमुख नंदा सारंग, उपशहर प्रमुख युवासेना अमन घोडावले, अशोक कासवकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.