कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मैंगलोर एक्स्प्रेसने ठाणे ते कणकवली असा प्रवास करीत असलेले कुंभवडे येथील मूळ रहिवासी शंकर रामचंद्र तावडे (सध्या रा. डोंबिवली) यांच्या बॅगेतील पॉकेटमधून साडेपाच हजारांची रोख रक्कम चोरणाऱ्या नितीश शेट्टी (४९, मूळ कर्नाटक, सध्या रा. अंबरनाथ) याला शुक्रवारी सकाळी रेल्वे पोलिसांच्या मदतीने कणकवली पोलिसांनी अटक केली होती. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
पोलिसांनी नितीश शेट्टी याच्याकडून साडेपाच हजारांची रोख रक्कम तसेच एका आयफोनसह चार मोबाइल हस्तगत केले आहेत. त्याचा आणखी काही चोऱ्यांमध्ये सहभाग असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तपास सुरु आहे.