सनातन संस्थेतर्फे आरवली येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात
वेंगुर्ले : भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्यांवरच असतो, हेच इतिहास सांगतो. आज ही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक असून राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होणे हीच खरी गुरुपौर्णिमेला गुरूंसाठी गुरुदक्षिणा ठरेल. अंतिम विजय हा धर्माचा असल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे राहा, असे आवाहन श्री. विष्णू कदम यांनी आरवली-वेंगुर्ले येथे केले. आरवली येथील साळगावकर मंगल कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. या महोत्सवांमध्ये उपस्थित वक्त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. कदम पुढे म्हणाले, भारतावर अंतर्गत आणि बाह्य शत्रूंकडून जी आक्रमणे होत आहेत ती केवळ विस्तारवादासाठी नाहीत, तर हिंदु धर्माला संपवण्यासाठी होत आहेत. पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी देश विचारून नाही, तर धर्म विचारून गोळ्या झाडल्या. आतापर्यंतच्या दंगलींचा इतिहासही हेच सांगतो की, जेथे जेथे धर्मांध माजले तेथे त्यांनी हिंदूंना, हिंदूंच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य केले. आज आपण युद्धसदृश अवस्थेत आहोत. हे फक्त सीमांवरील लढाईसारखे वाटत असले, तरी खरे युद्ध हे धर्मयुद्धच आहे. यावेळी आजगाव येथील श्रीमती सरिता प्रभू यांनी आपली साधना आणि अनुभूती सांगितल्या. कार्यक्रमाचा प्रारंभ श्री व्यासांचे पूजन आणि भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. सनातन राष्ट्र शंखनाद या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. तसेच रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. कार्यक्रम स्थळी धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शरद राऊळ यांनी मानले. या महोत्सवाला मोठ्या संख्येने साधक व नागरिक उपस्थित होते.