घरफोडी करीत दोन दुचाकी पळविल्या; गोवा व सावंतवाडी पोलिसांकडून संयुक्त तपास सुरु…
सावंतवाडी : पेडणे-गोवा येथे कारचालकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सहा चोरट्यांनी पळून जाण्यासाठी सावंतवाडीत दोन दुचाकी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर अन्य एका घरात त्यांनी चोरीचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. आज दुपारनंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी या चोरीचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. गोवा आणि सावंतवाडी पोलीस मिळून त्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान सावंतवाडीत घडलेल्या चोरी प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तर पेडणे येथे घडलेल्या हल्ल्याप्रकरणी पेडणे पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, या घटनेची माहिती गोवा पोलिसांना मिळताच त्यांनी संपूर्ण गोवा राज्यात नाकाबंदी केली. त्यात चोरटे आढळून आले नाहीत. त्यामुळे गोवा पोलिसांचे एक पथक या चोरट्याचा माग काढत थेट सावंतवाडीत आले होते. याची माहिती चोरट्यांना मिळताच चोरट्यांनी लागताच चोरीच्या कार मधून सर्वजण वेगळे होत सावंतवाडीतील- खासकिलवाडा परिसरात दोन दुचाकी चोरून नेल्या. यात चराठा हेल्थ पार्कच्या परिसरातील मिनल भिरमुळे याची दुचाकी तर हेल्थ पार्क परिसरात झोपलेल्या दोघांचे मोबाईल चोरून नेले. तर ज्यूस्तीनगर येथील डाॅ. दत्ता सावंत यांच्या बाजूलाच राहात असलेल्या पाॅवलीन रॉड्रिग्स एक दूचाकी अशा दोन दुचाकी चोरून नेण्यात चोरट्यांना यश आले आहे. दोन दुचाकीची चोरी केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा थेट राजेशकुमार सिन्हा भाड्याने राहात असलेल्या घराकडे वळवला. त्यांच्या घरात खिडकीतून आत मध्ये जात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप पर्यत या चोरीत कोणताही मुद्देमाल चोरीला गेला नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सावंतवाडी मध्ये बुधवारी रात्री या तीन ठिकाणी चोरीचे प्रकार करून ते मिळेल त्या रस्त्याने निघून गेले. त्यातील एक दुचाकी कणकवली-सावडाव येथे आढळून आली असून दुसर्या दुचाकीचा शोध अद्याप सुरू आहे. दरम्यान घटनेनंतर सायंकाळी उशिरा अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहाणी केली. तसेच चोरी बाबत पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडून माहिती घेतली. तसेच चोरीचा छडा लावण्याबाबत पोलिसांना सूचना केल्या आहेत. तसेच या प्रकरणी पोलिसांकडे तीन चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.