डॉ. अनंत डवंगे यांची माहिती
रुग्णालयात नवे विभाग आणि सेवा सुरु
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ८६ नवीन इंटर्न डॉक्टर्स रुजू झाले असून, अनेक नवीन विभाग व कक्ष सुरू करण्यात आले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली. रुग्णालयात नव्याने रुजू झालेल्या ८६ इंटर्न डॉक्टर्सना आय.सी.यू. आणि विविध कक्षांमध्ये नेमण्यात आले आहे, ज्यामुळे रुग्णसेवेत सकारात्मक बदल दिसून येत आहे. यासोबतच रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक कार्यालय नव्याने सुरू करण्यात आले असून, प्राध्यापक डॉ. शिल्पा नारायणकर (विकृतीशास्त्र) यांनी वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभेत घेतलेल्या निर्णयांनुसार, २०२५- २६ या आर्थिक वर्षात रुग्णालयात अनेक नवीन विभाग व कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यात प्री-ॲनेस्थेशिया चेक-अप ओपीडी, रेबीज प्रतिबंध ओपीडी, सर्जिकल आय.सी.यू. आणि मेडिकल आय.सी.यू. यांचा समावेश आहे. लघुशस्त्रक्रियागृह कक्ष सध्या प्रगतीपथावर आहे. या कक्षात दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत बाह्यरुग्ण विभागात जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, कान-नाक-घसा शास्त्र, नेत्र चिकित्सा शास्त्र आणि स्त्रीरोग यांसारख्या विभागांशी संबंधित लहान शस्त्रक्रिया सर्जन आणि तज्ञांमार्फत केल्या जातील. यात चरबीच्या गाठी, घामाच्या ग्रंथीच्या गाठी, सिस्ट, कर्करोगाशी संबंधित बायोप्सी, लिंफ नोड बायोप्सी, अल्सर सर्जरी इत्यादींचा समावेश आहे. कान-नाक-घसा शास्त्र यांसारख्या विविध विभागांसाठी नवीन रुग्ण कक्ष सुरू केले जातील. तसेच श्वसनासंबंधीच्या आजारांसाठी आय.आर.सी.यू. आणि हाय डिपेंडन्सी युनिटही सुरू करण्यात येईल. ५० खाटांच्या क्रिटिकल केअर रुग्णालयाला शासनाकडून परवानगी मिळाली असून, जागा निश्चित करण्यात आली आहे. लवकरच त्याचे बांधकाम सुरू होणार आहे. क्ष-किरण शास्त्र विभागासाठी एम.आर.आय. मशीनचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून, नवीन मशीन उपलब्ध होईपर्यंत एम.आर.आय. तपासणी सेवा बाह्य स्रोतांद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. नर्सिंग महाविद्यालय आणि सुरक्षा वाढ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात बी.एस.सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यास केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली आहे.