शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेत केली मागणी
सावंतवाडी : माठेवाडा येथील प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या भाजप पक्षाच्या देवगड माजी नगराध्यक्षा प्रणाली मिलिंद माने व त्यांचा मुलगा आर्य माने यांना तात्काळ अटक करा, प्रणाली माने यांचे पती मिलिंद माने यांच्या फोनचे सिडीआर तपासून त्यांचीही चौकशी करा,प्रिया चव्हाण यांना या अगोदर मारहाण झाल्याचेही माहिती असून तिच्या आत्महत्ये अगोदर घटना स्थळावर कोण कोण आले,कोणाच्या गाड्या आल्या याचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करून या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक मोहन दहीकर यांची भेट घेऊन केली त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक,माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, देवगड तालुका प्रमुख रविंद्र जोगल, देवगड महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकूर, देवगड नगरसेवक विशाल मांजरेकर, विभागप्रमुख विकास कोयंडे, माजी सभापती रेश्मा सावंत,शाखाप्रमुख गौरव सावंत आदी उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सावंतवाडी- माठेवाडा निर्माण प्लाझा येथील प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने व त्यांचा मुलगा आर्य माने यांच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रिया हिचे वडील विलास तावडे यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात रविवारी तक्रार दिली आहे. प्रणाली माने या भाजप पक्षाच्या देवगड नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका आहेत त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्यानेच प्रणाली माने आणि आर्य माने यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. त्याचबरोबर याप्रकरणात प्रणाली माने यांच्या पतीची देखील चौकशी करावी. घटनेनंतर प्रकरण मिटविण्यासाठी माने कुटुंबियांनी कोणाकोणाला फोन केले त्याचे सीडीआर तपासावेत. प्रिया चव्हाण यांना मारहाण झाल्याचेही माहिती असून तिच्या आत्महत्ये अगोदर घटना स्थळावर कोण कोण आले,कोणाच्या गाड्या आल्या याचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करण्यात यावा. प्रिया चव्हाण यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी नि:पक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी करावी आणि प्रणाली माने आणि आर्य माने यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सावंतवाडी माठेवाडा येथे चव्हाण कुटुंबियांचे केले सांत्वन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी माठेवाडा येथे चव्हाण कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, उपजिल्हासंघटक शब्बीर मणियार, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, श्री नाटेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.