सिंधुदुर्गातील जोडप्यांसाठी आनंदाची बातमी
कोकण संस्थेला मिळाली मान्यता
बांदा : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला आता विशेष दत्तक संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. ही संस्था गेल्या १३ वर्षांपासून मुलांच्या शैक्षणिक, आरोग्य, जडणघडण आणि संगोपन या विषयांवर राष्ट्रीय पातळीवर काम करत आहे. याच अनुभवामुळे आणि निस्वार्थ कार्यामुळे संस्थेला विनाअनुदानित तत्वावर ही महत्त्वपूर्ण मान्यता मिळाली आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी एकही संस्था नसल्यामुळे दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळत नव्हती. आता कोकण संस्थेला मिळालेल्या मान्यतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक जोडप्यांना दत्तक घेण्याची प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, भावनिक तयारी आणि कायदेशीर आवश्यकतांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळेल. एकदा दत्तक मूल घेण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर, जोडप्याला त्यांच्या पसंतीनुसार दत्तक घेण्यायोग्य मुलांचे प्रोफाइल दाखवण्यापासून ते सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करे पर्यंतची मदत आता त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होईल. यामुळे इच्छूक जोडप्यांना लांबचा प्रवास करावा लागणार नाही आणि त्यांना स्थानिक भाषेत सर्व माहिती मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोकण संस्था आता कायदेशीररित्या अनाथ मुलांना सरकारच्या नियमांनुसार दत्तक देऊ शकणार आहे. यामुळे मूल नसलेल्या इच्छूक जोडप्यांना पालक होण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या विशेष दत्तक संस्था म्हणून मान्यता मिळवण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा यांचे विशेष सहकार्य लाभले.