सावंतवाडीतील घटना ; संबंधिताचा शोध घ्या, पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे मागणी
सावंतवाडी : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून सावंतवाडी शहरात लावण्यात आलेले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आले आहेत. याबाबत संबंधित महिला पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून ते बॅनर फाडणाऱ्यांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत महिला तालुका अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी मेघना साळगावकर उपस्थित होत्या. याबाबत त्यांनी निवेदन दिले. त्यात असे म्हटले आहे की, आपण गार्डन परिसरात आणि श्रीराम मंदिर समोर लावलेले बॅनर अज्ञातांकडून फाडून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे तो व्यक्ती नेमका कोण? याचा शोध घेण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण बॅनर फाडणाऱ्याचा शोध घेऊ व त्याच्यावर कारवाई करू, असे आश्वासन पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी दिले आहे.