26 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

इनोव्हा कार देण्याच्या बहाण्याने वृध्दाची 4 लाख 80 हजारांची फसवणूक

कणकवली : एसबीआयच्या अधिकाऱ्याने बँकेच्या लिलावातील चारचाकी खरेदी करून देतो असे सांगून विश्वास संपादन करून सेवानिवृत्त अभियंता असलेल्या एका जेष्ठाची फसवणूक केल्याचा प्रकारा उघडकीस. रतनकुमार मनोज सावंत (७४, मुळ रा. भिरवंडे, सध्या रा. मुंबई) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली आहे.

फिर्यादीनुसार एसबीआयचा प्रोबेशनरी अधिकारी प्रियंक आंगणे (वय ५५, रा. आंगणेवाडी, मालवण, सध्या रा. मुंबई) याच्या विरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रतनकुमार सावंत यांची वैभववाडी तालुक्यात शेतजमीन आहे. शेतीच्या कामासाठी त्यांचे नेहमीच याठिकाणी ये-जाणे सुरू असते. ११ ते १८ मार्च दरम्यान रतनकुमार हे एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळी प्रियंक आंगणे याची त्यांच्यासोबत ओळख झाली. रतनकुमार यांनी आपणास एक गाडी हवी आहे, असे त्यांनी प्रियंक याला सांगितले. प्रियंक याने आपण एसबीआय बँकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. बँकेच्या लिलावातील अनेक गाड्या माझ्या उपलब्ध आहेत. त्यापैकी एक गाडी तुम्हाला देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. कणकवलीतील एका बँकेत खाते असलेल्या रतनकुमार यांनी तीन चेकद्वारे ४ लाख ८० हजार रुपये काढले. ही रक्कम त्यांनी प्रियंक याला दिली. त्यानंतर दोघांमध्ये कारबाबत मोबाईलवरून चर्चा होत होती. काही काळानंतर रतनकुमार यांनी कारदेण्याबाबत प्रियंक याच्याकडे तागदा लावला होता.

मात्र, प्रियंक याने टोलवाटोलवी उत्तरे देत कारदेण्याबाबत टाळाटाळ केली. रतनकुमार यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात प्रियंक याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार प्रियंक याचाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!