एका विरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कणकवली : झाडे तोडली म्हणून वनविभागाकडे तक्रार केल्याचा राग आला. त्यामुळे बिडवाडी येथील मांगरवाडीतील शशिकांत लाड ( वय ४८ ) यांना वसंत लाड ( वय ५५ ) यांनी शिवीगाळ करत बांबूने मारहाण केली. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नीला देखील शिवीगाळ केली. या प्रकरणी वसंत ला यांच्या विरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना ही शुक्रवारी सकाळी ११:३० वा. च्या. सुमारास घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शशिकांत लाड यांच्या बिडवाडी येथील २१ गुंठे जमिनीतील झाडे वसंत लाड यांनी दोन वर्षापूर्वी तोडली होती. त्यामुळे शशिकांत लाड यांनी वनविभागाकडे तक्रार केली होती. तसेच भूमिअभिलेख विभागाकडून जमिनीची मोजणी करून घेतली.तसेच मोजणीचे कागदपत्र वनविभागाला सादर केले. त्यामुळे वनविभागाने त्या दोघांना बोलावून त्यांच्या जमिनीतील झाडे दाखविली. वन कर्मचारी निघून गेल्यावर शशिकांत लाड व त्यांची पत्नी घरी जात होते. त्यावेळी वसंत लाड यांनी शशिकांत लाड यांच्याशी वाद घातला. तसेच माझ्या विरोधात निर्णय गेला आहे, असे म्हणत शिवीगाळ करत कुंपणाच्या बांबूने त्यांना मारहाण केली. तसेच शशिकांत यांची पत्नीलाही शिवीगाळ करत ‘ तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही’ असे म्हणत धमकी दिली. त्यामुळे शशिकांत लाड यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. त्यावरून पोलिसांनी वसंत लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.