माजी आमदार परशुराम उपरकर यांची घणाघाती टीका
पालकमंत्री, खासदार, आमदार असलेल्या राणे कुटूंबाला आणखी कोणते पद हवे जेणेकरून जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न सुटेल?
कणकवली : गेली ३ वर्षे भाजप आणि शिंदे गटाची राज्यात सत्ता आहे. गेले सहा महिने नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नारायण राणे खासदार आहेत. आणि स्वतः निलेश राणे आमदार आहेत असे असताना निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयाच्या समस्यांबाबत पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडून आपला व आपल्या वडिलांचा आणि आपल्या भावाचा नाकर्तेपणा राज्यासमोर आणला आहे अशी घणाघाती टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य समस्या सोडविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून ते सुरु केले.त्यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केला होता.त्यावेळी कोरोना काळ असताना देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात चांगली सेवा दिली जात होती. मात्र सरकार बदलल्यानंतर गेल्या ३ वर्षात फडणवीस- शिंदे सरकारने या महाविद्यालय आणि रुग्णालयाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था केली आहे. हि व्यवस्था सुधारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वारंवार आवाज उठवून आंदोलने करीत आहे. मात्र गेले सहा महिनेहुन अधिक काळ राणे कुटुंबाकडे संपूर्ण जिल्ह्याची सत्ता असताना देखील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न अधिवेशनात मांडावा लागत असेल तर पालकमंत्री,खासदार,आमदार असलेल्या राणे कुटूंबाला आणखी कोणते पद हवे जेणेकरून जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न सुटेल? असा सवाल श्री उपरकर यांनी केला.
नारायण राणे यांनी ३५ वर्ष राजकारण करून २० वर्षे ते जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा आरोग्याच्या बाबतीत ते काहीही करू शकले नाही. खरंतर आपले खाजगी मेडिकल कॉलेज चालावे यासाठी नारायण राणे,नितेश राणे आणि निलेश राणे हे शासकीय मेडिकल कॉलेज बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण गेल्या ३ वर्षात हे सर्व मंडळी सत्तेत असताना त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये सुधारणा करण्यासाठी एक बैठक देखील घेतली नाही. शासकीय मेडिकल कॉलेज आमदार निलेश राणेंच्या मतदार संघात येते त्यामुळे खरोखरच निलेश राणेंना हा प्रश्न सोडवायचा होता तर त्यांनी त्याठिकाणी किती वेळा आढावा घेतला? त्यासाठी कोणती उपाययोजना केली? हे त्यांनी जाहीर करावे.याउलट शासकीय मेडिकल कॉलेजकच्या नवीन इमारत बांधकामाचे टेंडर आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळावे यासाठी राणेंकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. तेच प्रयत्न मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयातील सेवा सुधारण्यासाठी केले असते तर आज अधिवेशनात प्रश्न विचारण्याची वेळ आली नसती.त्यामुळे सर्व सत्ता केंद्रे हातात असताना देखील निलेश राणे हे शासकीय मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयाच्या समस्या अधिवेशनात मांडून, आम्ही जनतेसाठी कायतरी करतोय असे दाखवून, जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी घणाघाती टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.