कणकवली : शहरातील बांधकरवाडी श्रीरामनगर येथील सचिन पवार ( कणकवली बांधकरवाडी ) यांना मारहाण करून त्यांच्यावर ब्लेडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांच्या छातीला साधारणतः वीस टाके पडले होते. याप्रकरणी सचिन पवार यांनी कणकवली पोलीस ठाण्यात आपली फिर्याद नोंदवली. सचिन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप नामदेव पवार, मंदार दिलीप पवार, चेतन दिलीप पवार, जयश्री दिलीप पवार, काजल मंदार पवार ( रा. बांधकरवाडी श्रीरामनगर ) अशी त्यांची नावे आहेत. सचिन पवार यांनी मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास व्हाट्सॲप वर हॅप्पी फॅमिली ग्रुपवर कोंबडी व बकरे कापण्याच्या कार्यक्रमाला कोणी उपस्थित राहू नका, जर तुम्ही उपस्थित राहिला तर तुमच्यावर जादूटोणा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा मेसेज पाठवला होता. याचा दिलीप पवार व त्याच्या कुटुंबीयांना राग आल्याने त्यांनी सचिन पवार व त्याची पत्नी माधुरी पवार हिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चेतन पवार याने सचिन पवार यांच्या छातीवर पोटावर व हाताच्या बोटावर ब्लेडने हल्ला केला. यात सचिन पवार हे गंभीर जखमी झाले. तसेच दिलीप पवार व अन्य चार जणांनी सचिन पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
यानुसार संशयित दिलीप पवार मंदार पवार चेतन पवार जयश्री पवार काजल पवार यांच्यावर इच्छापूर्वक दुखापत व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद सुपल करत आहेत.