कुडाळ : शहारत नगर पंचायत कडून मुख्य रस्त्याच्या बाजूला जे कॉंक्रिट गटार बांधकाम होत आहे, ते नियमानुसार आणि रस्त्याच्या मध्यापासून ११ मीटर वर होत असल्याची माहिती नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि नगर पंचायतच्या नगर अभियंता सोनाली हळदणकर यांनी दिली. शहरातील जिजामाता चौकात या गटार बांधकामाला अलीकडे काही व्यावसायिकांनी विरोध केला होता, त्या पार्श्वभूमीवर नगर पंचायत नेमकी कोणती भूमिका घेणार या विषयी उत्सुकता होती. पण आता मंगळवार पासून हे काम सुरु करण्यात आले आहे.
कुडाळ शहारत नगर पंचायत मार्फत मुख्य रस्त्यावरील पोलीस ठाणे ते जिजामाता चौक दरम्यान एका बाजूला कॉंक्रिट गटाराचे काम सुरु आहे.त्यामुळे साईडपट्टीची रुंदी बऱ्यापैकी वाढली आहे. पोस्ट कार्यालयापासून जिजामाता चौक येथे सध्या हे काम सुरु असून शनिवारी कॉंक्रिट गटाच्या बांधकामाला जिजामाता चौकातील काही व्यावसायिकांनी विरोध केला. पण शनिवार रविवार सुट्टी असल्याने याबाबत नगर पंचायतची भूमिका समजू शकली नव्हती. या संदर्भात नागराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि नगर अभियंता सोनाली हळदणकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी याबाबत नगर पंचायतीची भूमिका स्पष्ट केली.
नगर अभियंता सोनाली हळदणकर यांनी सांगितले, हे एकूण ३५० मीटर लांबीचे कॉंक्रिट गटार बांधकाम आहे. मुख्य रस्त्याची रुंदी २४ मीटर आहे त्यामुळे रस्त्याच्या मध्यापासून ११ मीटरवर गटार बांधकाम होईल. उरलेला एक मीटरचा भाग हा भविष्यातील पाणी, गॅस, वगैरेंच्या पाईपलाईन, सुशोभीकरण वगैरेसाठी राखीव ठेवलेला आहे. सगळीकडे रस्त्याच्या मध्यापासून ११ मीटर वर गटार बांधकाम सुरु असल्याचे श्रीमती हळदणकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुख्य रस्त्याच्या पलीकडच्या बाजूच्या गटाराचे काम गणेशोत्सवानंतर सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.