23.3 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

नदीपात्रातील मृतदेह काढण्यासाठी सरसावली शासकीय यंत्रणा

मात्र तो निघाला टेडी बिअर: सरबंळ येथील घटना

कुडाळ पोलीस प्रशासनाची सतर्कता

कुडाळ : सरंबळ नदीपात्रात एक मृतदेह वाहून आला असून तो मृतदेह झाडीत अडकला आहे, असा फोन कुडाळ पोलिसांना आला. पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेने सतर्कता दाखवत फायबर बोट व सर्व यंत्रणेसह सरंबळ नदीपात्र गाठले‌. मात्र, नदीपात्रात उतरून खात्री केल्यावर तो एक मोठ्या आकाराचा टेडी बिअर निघाला. मात्र, हा विषय सरंबळ पंचक्रोशीत चर्चेसाठी कारणीभूत ठरला.
कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. हा पाऊस कधी कमी तर कधी जास्त अशा स्वरूपाचा आहे. पाऊस वाढलेला असताना नदीपत्रात पूरस्थिती निर्माण होते. मंगळवारी रात्री कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे तालुक्यात नदीपात्रात पूरस्थिती निर्माण झाली होती. अशातच बुधवारी संध्याकाळी सरंबळ भागात एका मनुष्याचा मृतदेह तरंगत असल्याचा संशय आला. सरंबळ येथील एका झाडीत हा मृतदेह अडकल्याचे लांबून दिसत होते. हे काहींनी पाहिल्यावर याबाबत पोलीस यंत्रणेला माहिती देण्यात आली. सध्या स्थितीत पाऊस पडत असल्याने वरच्या भागातील एखादी व्यक्ती वाहून पाण्यातून आली असावी व तिचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांना व स्थानिकांना अंदाज झाला. याबाबत कुडाळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. नदीपात्र तुडुंब भरलेले असल्याने नदीपत्रात उतरणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आपत्कालीन यंत्रणेची फायबर बोट घेत अन्य काही व्यक्तींसह नदीपात्र गाठले. संबंधित यंत्रणा तिथपर्यंत पोहोचल्यावर लांबून मृतदेहासारखे दिसणारे दृश्य हे एका टेडी बिअरचे असल्याचे लक्षात आले. यानंतर स्थानिकांसह संबंधित प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. सरंबळ भागात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची चर्चा या भागात मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यामुळे अनेकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. मात्र, नदीपात्रात सापडलेला हा एक टेडीबिअर असल्याचे लक्षात येताच हा एक चर्चेचा विषय ठरला. याबाबत कुडाळ पोलीस व आपत्कालीन यंत्रणेने तत्परता दाखवत योग्य त्या हालचाली तत्पर्तने केल्या. त्यामुळे कुडाळ पोलीस प्रशासनाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!