कुडाळ : नगरपंचायत प्रशासनानेआठवडा बाजारादिवशी शहरात फिरत्या भाजी आणि फळ विक्रेत्यांमध्ये प्लास्टिक बंदी आणि स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबवली. नगरपंचायतीकडून शहरात प्लास्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत व्यापारी, व्यावसायिक आणि फिरत्या विक्रेत्यांमध्ये जनजागृती करून नगरपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. काल आठवडा बाजारादिवशी पोस्ट ऑफिस चौक ते जिजामाता चौक दरम्यान मुख्य रस्त्यालगत फिरत्या भाजी विक्रेत्यांकडून बाजार संपल्यानंतर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा प्रकार समोर आला होता. याची दखल नगरपंचायत प्रशासनाने त्वरित घेऊन कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत नगरपंचायतीच्या पथकाने आज शहरात जनजागृतीपर मोहीम राबवली. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या मार्गदर्शनाखाली न.पं.चे प्रशासकीय अधिकारी राजू पठाण, कर व मिळकत विभाग प्रमुख निलेश म्हाडेश्वर, लिपिक गजानन पेडणेकर, मुकादम दीपक कदम, रोहित परब, प्रवीण कोरगावकर, केतन पवार, सतीश जाधव, साहिल कुडाळकर यांचा या पथकात समावेश होता. यावेळी काही फिरत्या भाजी विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्या जप्त करत कारवाई करण्यात आली. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करावा, आणि बाजार संपल्यानंतर टाकाऊ कचरा रस्त्यालगत न टाकता त्याच दिवशी नगरपंचायतीच्या घंटागाड्यांवर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या. यासाठी नक्षत्र टॉवर आणि पोस्ट ऑफिससमोर अशा दोन ठिकाणी घंटागाड्या आठवडा बाजारादिवशी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ध्वनिक्षेपकाद्वारे प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आणि प्लास्टिकचा वापर केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला.