24.3 C
New York
Sunday, July 6, 2025

Buy now

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता कुडाळात अतिक्रमणावर कारवाई ; नगराध्यक्षांचा इशारा

व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, बैठकीत आवाहन

कुडाळ : शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केले. सौ. बांदेकर यांनी आज शहरातील व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, गोविंद सावंत, द्वारकानाथ घुर्ये, पी.डी. शिरसाट, विद्याप्रसाद बांदेकर, सुनील भोगटे, प्रसाद शिरसाट, संजय भोगटे, संदेश पडते, भूषण मठकर, नितीश म्हाडेश्वर, अमेय शिरसाट, राकेश वर्दम, आपा भोगटे, भाऊ राऊळ, संजय बोभाटे, पपू नार्वेकर, सतीश वर्दम, महेश ओटवणेकर, जयराम डिगस्कर अरविंद करलकर, प्रकाश कुंटे आदी उपस्थित होते. सुरूवातीला वाहतूक कोंडी, अतिक्रमण, प्लास्टिक बंदी याबाबत उपस्थित व्यापाऱ्यांनी मते व्यक्त केली. बाजारपेठेतील रस्ता मोकळा करावा, माल घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांना ठरावीक वेळ ठरवून द्यावी, ज्या ठिकाणी रस्त्यालगत अतिक्रमण झाले असेल तर संबंधितांना नोटीस देऊन, पुढील कार्यवाही करावी, तसेच याबाबत पोलीस, नगरसेवक व व्यापारी यांची बैठक घेऊन, कार्यवाहीची अंमलबजावणी करण्यात यावी. फिरत्या विक्रेत्यांना न.पं.ने जागा नेमून द्याव्यात, प्लास्टिक बंदी बाबत नागरिकांमध्येही जनजागृती करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. पोस्ट ऑफीस चौका दरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मालवण रोडलगतच्या सर्व टपऱ्या हटविण्याची सूचना करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ.बांदेकर म्हणाल्या की, शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी न.पं. कडून प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचबरोबर रस्त्यालगतच्या अतिक्रमणावरही कारवाई करण्यात येणार आहे. यात नियम सर्वाना सारखाच असेल. व्यापारी संघटनेनेही एक पत्र न.पं.ला द्यावे, त्यानंतर कार्यवाही हाती घेण्यात येईल. प्लास्टिक बंदी याबाबतचीही अंमलबजावणी करण्यात येत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, व्यापाऱ्यांनीही स्वतः नियम घालून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. बुधवारी आठवडा बाजारादिवशी मुख्य रस्त्यालगत पोस्ट ऑफीस चौक पर्यंत फिरत्या विक्रेत्यांना मुभा देण्यात आलेली आहे. अन्य दिवशी या ठिकाणी दुकाने थाटण्यास बंदी घालण्यात आली आहे. फेरीवाले, भाजी विक्रेत्यांनी न.पं.च्या नियमांचे पालन करावे, अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल. आमदार निलेश राणे यांच्या या शहराच्या विकासासाठी अनेक संकल्पना आहेत. हाॅटेल अभिमन्यू ते काळपनाका मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिला आहे. लवकरच हा रस्ता काँक्रिटचा आणि रूंद होणार आहे. शहर विकसित शहर बनविण्याचे आ. राणे यांचे प्रयत्न आहेत. शहर विकासासाठी व्यापारी व नागरीकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी यावेळी सांगितले. त्यावर शहर विकासासाठी आम्हा सर्वाचे निश्चित सहकार्य राहील अशी ग्वाही उपस्थित व्यापाऱ्यांनी दिली. प्लास्टिक बंदीबाबत ध्वनिक्षेपकाद्धारे न.पं. मार्फत नागरिकांमध्येही जनजागृती केली जाईल असे कर निरीक्षक श्री.पठाण म्हणाले. यावेळी नगरसेवक उदय मांजरेकर, मंदार शिरसाट, नगरसेविका आफरीन करोल, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, कर निरीक्षक राजू पठाण व दत्ताराम म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!