29.8 C
New York
Sunday, July 6, 2025

Buy now

नशेत असलेल्या गोव्यातील “राईडर्सची” सावंतवाडी पोलिसांशी झटापट

एक पोलिस किरकोळ जखमी; फिल्मी स्टाईल गाडी अडवून हेल्मेटने काचा फोडल्या…

सावंतवाडी : जीवाची मजा करण्यासाठी आंबोलीत गेलेल्या ओल्ड गोवा आणि बार्देस येथील दहा ते बारा युवा “राईडर्सनी” थेट सावंतवाडी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी झटापट केल्याचा प्रकार आज घडला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना आज सायंकाळी साडे सहा वाजता पोलिस ठाण्यात घडली. तत्पूर्वी ओव्हरटेक केल्याच्या रागातून झालेल्या वादात त्यांनी इन्सुली येथील एकाच्या कारची लाईट हेल्मेट मारून फोडली तर बस स्थानक परिसरात फील्मीस्टाईल दुचाकी आडवी घालून कार अडविण्यात आली. त्यामुळे हा सर्व प्रकार पोलिस ठाण्यात गेला. या प्रकारानंतर पोलीस चक्रावले असून त्यातील चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ते नशेत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारची बांदा बाजारपेठ बंद असल्याने, बांदा येथील पाच पर्यटक आंबोली येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. आंबोली घाट उतरत असताना दापोली येथे त्यांनी गोव्यातील दुचाकीस्वारांना बाजूला होण्यास सांगितले. यावरून वाद सुरू झाला. गोव्यातील सुमारे १० ते १२ तरुण आंबोली पर्यटन स्थळावर एकत्र आले होते. त्यांनी बांदा येथील कारचा पाठलाग केला. दाणोली येथील पोलीस नाक्यावर कार थांबताच, गोव्यातील तरुणांनी एकत्र येऊन हेल्मेटने कारवर आदळत दादागिरी केली. त्यानंतरही त्यांचा पाठलाग सुरूच होता. सावंतवाडी बस स्थानकासमोरील बांधकाम विभागाच्या वळणावर त्यांनी कारसमोर दुचाकी लावून अपघातासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आबा पिळणकर आणि सुनील नाईक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोव्यातील तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारातही गोव्यातील तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बांदा येथील कार चालकही तेथे पोहोचले होते. पोलिसांनी विचारपूस करत असतानाच, गोव्यातील तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत एका पोलीस हवालदाराच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन एक्स-रे काढण्यात आले. या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, शरद लोहकरे, अमित राऊळ, आबा पिळणकर, सुनील नाईक आणि अन्य पोलिसांनी गोव्यातील तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोवा राज्यातील तरुणांना आंबोली पर्यटनाची “झिंग” चढल्याप्रमाणे त्यांनी उद्धट भाषा वापरली आणि पोलिसांशीही झटापट केली असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण हे पोलिस ठाण्यात नव्हते, त्यांनी मोबाईल वर बोलताना आपण गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!