30.4 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

कलमठ येथे घरफोडी करणारा चोरटा कर्नाटकात गजाआड

कणकवली : कलमठ बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडून दोन बंगल्यांमधील मिळून जवळपास २ लाखांहून अधिक मुद्देमाल चोरणारा चोरटा अखेर गजाआड झाला आहे. एलसीबी पोलीस व कणकवली पोलीस यांनी संयुक्तपणे शोधमोहिम राबवत चोरटा लखन अशोक कुलकर्णी उर्फ सचिन राजू माने उर्फ (२८, रा. पंढरपूर -सोलापूर) याला गोकर्ण (राज्य कर्नाटक) येथे शनिवारी सायंकाळी सापळा रचून अटक केली. दोन नावांनी वावरत असणारा चोरटा अशोक हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याने यापूर्वीही सिंधुदुर्गात घरफोडी, चोरीचे अनेक गुन्हे केले आहेत. विशेष म्हणजे एका घरफोडीच्या गुन्ह्यात साधारण १३ वर्षांपूर्वी कणकवली पोलिसांनी त्याला अटक केली होती, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. चोरट्यास आज रविवारी दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कलमठ – बिडयेवाडी येथील घरफोड्या २ जूनच्या पहाटे घडल्या होत्या. चोरट्याने बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडले होते. त्यातील संजय सावंत व माधव ढेकणे यांच्या घरातून जवळपास २ लाखांचे दागिने व अन्य मुद्देमाल चोरण्यात चोरट्याला यश आले होते. दरम्यान तपासावेळी पोलिसांनी माहिती घेतली असता चोरटा लखन हा सीसीटीव्हमध्ये दिसून आला होता. सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या चोरट्याचा वावर, घरफोड्या करण्याची पद्धत यावरून ही घरफोडी करणारा लखन कुलकर्णी हाच असावा, असा अंदाज पोलिसांनी काढला. त्यांतर पोलिसांनी लखन याचा शोधा सुरू केला.

माहिती घेतली असता बिडयेवाडी येथील घरफोडीनंतर कर्नाटक राज्यातील एका चोरीमध्ये लखन याला अटक झाली व तो अवघ्या चार दिवसांपूर्वीच कोठडीतून सुटला अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी त्याचे राहते घर असलेला पंढरपूर तालुका गाठून गुप्त सापळाही रचला. मात्र, कर्नाटक येथील कोठडीतून सुटल्यानंतरही लखन आपल्या घरी आला नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गुप्त माहितीगाराद्वारे लखन याच्या काही मित्रमंडळींशी संपर्क साधला. त्यासह पोलिसांनी अनेक तांत्रिक बाबीही तपासल्या. त्यानुसार लखन हा गोकर्ण येथे असल्याचे समजून आले. अखेरीस एलसीबी व कणकवली पोलिसांनी गोकर्ण गाठले. शनिवारी सायंकाळी पोलिसांच्या दोन्ही पथकांनी मिळून संशयितास गोकर्ण येथेच सापळा रचून अटक केली. त्याला कणकवली पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी करण्यात आली.

संशयित लखन याने सिंधुदुर्गासह, रत्नागिरी, कोल्हापूर , सांगली, सोलापूर तसेच कर्नाटक व गोवा राज्य आदी ठिकाणी मिळून ५० ते ६० गुन्हे केले आहेत. २०१२ साली कणकवली तालुक्यात झालेल्या घरफोडीप्रसंगी तसेच २०२२ साली मालवण व सावंतवाडी येथे झालेल्या घरफोडीप्रसंगी त्याला अटकही झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. लखन याला अटक करणाऱ्या पथकामध्ये पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, एलसीबी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, हवालदार गंगावणे, देसाई, कणकवली पोलीस ठाण्याकहे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पूजा नांदोसकर यांचा समावेश होता. संशयितास रविवारी दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी घरफोडीतील मुद्देमाल हस्तगत करणे, संशयिताचे अन्य साथीदार असल्यास त्यांचा शोध घेणे आदी कारणांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!