प्रभाग रचनेचा कार्यक्रम निश्चित : मुख्याधिकारी गौरी पाटील यांची माहिती
कणकवली : शासनाच्या नगरविकास विभागाने नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रारुप प्रभाग रचनेचे वेळापत्रक घोषित केले आहे. त्यानुसार कणकवली नगरपंचायतीमध्ये एक सदस्यीय पद्धतीनुसार प्रभाग रचना होणार आहे. कणकवली नगरपंचायतीमध्ये पूर्वीप्रमाणेच १७ प्रभाग असणार आहेत. या प्रभागांची १७ जून पासून प्रारूप प्रभाग रचना केली जाणार अाहे. याबाबतची माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या प्रभाग रचनेबाबत शासनाने प्रभाग रचनेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्रभाग रचना व हद्द निश्चितीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
कणकवली नगरपंचायत चे यापूर्वी १७ प्रभाग कार्यरत होते. यासर्व प्रभागांसाठी १७ नगरसेवक असणार आहेत. गेल्या पाच वर्षात वाढलेली घरे, लोकसंख्या विचारात घेऊन शहरातील प्रभागांची नव्याने रचना केली जाणार आहे. तत्पूर्वी शहराची हद्द निश्चिती केली जाणार असून त्यासाठी सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत. प्रभागांची रचना आणि शहराची हद्द निश्चिती करत असताना यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल करण्यात येतील अशी माहिती कणकवली नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली
शासनाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार १७ जून ते ३ जुलै पर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर चार ते आठ जुलै या कालावधीमध्ये प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव आयोगाला सादर करण्यात येणार आहे. १५ ते २१ जुलै पर्यंत सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. तर २२ ते ३१ जुलै या कालावधीमध्ये प्राप्त सूचना व हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत अंतिम प्रभाग रचनेच्या मान्यता साठी प्रस्ताव देण्यात येणार आहे. तर २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.