27.7 C
New York
Monday, July 7, 2025

Buy now

सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या संशयित चोरट्याला देवगड पोलिसांनी घेतले ताब्यात

देवगड : देवगड किल्ला येथील शारदा चिंतामण मुणगेकर (९०) या रात्रीच्या सुमारास घरात झोपलेल्या असताना त्यांच्या हातातील ११ ग्रॅम वजनाची सुमारे एक लाख रुपये किंमतीची सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या संशयित चोरट्याला देवगड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या काही तासांतच पकडले. रत्नाकर शांताराम मांजरेकर (वय ४२, रा. वैभववाडी- कोकिसरे, सध्या रा. देवगड किल्ला) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. ही घटना ८ जून रात्री ९ वा. ते ९ जून रोजी दुपारी १२.३० च्या कालावधीत घडली. संशयिताला देवगड पोलिसांनी अटक करून देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने संशयिताला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड किल्ला येथील अमोल गणपत वाडेकर यांच्या घरात त्याची आत्ये शारदा चिंतामण मुणगेकर या राहत आहेत. संशयित रत्नाकर मांजरेकर हा त्यांचा नातेवाईक असून तोदेखील गेले १० ते ११ महिने वाडेकर यांच्या घरात राहत आहे. ८ जून रोजी रात्रीच्या सुमारास शारदा मुणगेकर या घरात झोपलेल्या असताना त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी चोरीस गेली. ही बाब ९ जून रोजी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर अमोल वाडेकर यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल होताच देवगड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व प्राथमिक तपासात रत्नाकर मांजरेकर हा या घटनेत संशयित चोरटा असल्याचे स्पष्ट झाले. संशयिताच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे देवगड पोलिसांनी संशयिताला वेंगुर्ले येथून ताब्यात घेतले. संशयित रत्नाकर मांजरेकर याने गुन्हयाची कबुली दिली असून चोरलेली सोन्याची बांगडी वैभववाडी येथे विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. देवगड पोलिसांनी वैभववाडी येथून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनानुसार देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव, पोलीस हवालदार आशिष कदम, योगेश लगड, कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर, नीलेश पाटील यांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास केला.

दरम्यान, याप्रकरणी देवगड पोलिसांनी संशयित रत्नाकर मांजरेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत देवगड न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने संशयिताला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!