अन्यथा येत्या १५ दिवसांत उपोषण करण्याचा इशारा
बांदा : वाफोली गावात धरणाच्या लाभक्षेत्र आणि बुडीत क्षेत्रालगत अनधिकृतपणे कार्यरत असलेला क्रशर येत्या १५ दिवसांत हटवून परिसर मोकळा करा, अन्यथा २५ जूनला तलाठी कार्यालय, बांदा येथे उपोषण करू, असा इशारा साईप्रसाद कल्याणकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, वाफोली येथील संबंधित क्रशर हा धरणाच्या संवेदनशील क्षेत्राजवळ अनधिकृतपणे कार्यरत आहे. क्रशर युनिट त्वरित बंद करून तेथील काळ्या दगडांचा साठा पूर्णपणे काढून टाकावा आणि संपूर्ण परिसर मोकळा करावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी वाफोली येथील संबंधित क्रशरच्या एन.ए दस्तऐवजाची दंडासहित वसुली करण्याची, तसेच देवस्थानच्या जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याबद्दल दंड आणि शिक्षा करण्याची मागणी केली आहे.